राजकारण

खडसेंच्या पत्नी मंदाकिनींचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला

मुंबई : पुण्यातील भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे. मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. याच प्रकरणात एकनाथ खडसेही आज सत्र न्यायालयात जाऊ शकले नाहीत. खडसे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे ते सध्या बॉम्बे रुग्णालयात दाखल आहेत.

खडसे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती त्यांच्या वकिलाने आज कोर्टात दिली. त्यामुळे कोर्टासमोर हजर राहण्यास खडसेंच्या वकिलांनी वेळ मागितला आहे. न्यायालयाकडूनही खडसे यांना उपस्थित राहण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. हे सर्व २०१६ चं प्रकरण असून त्यावेळी एकनाथ खडसे महसूल मंत्री होते. महत्त्वाचं म्हणजे एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी सध्या अटकेत आहेत.

एकनाथ खडसेंवर अटकेची टांगती तलवार?

माझ्यामागे ईडी लावली तर मी सीडी लावेन, असा इशारा एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेशावेळी दिला होता. त्यामुळे ईडीची चौकशी लागल्यानंतर एकनाथ खडसे काय करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. भोसरी एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीचा तपास हा योग्य दिशेने सुरु आहे. गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर आता स्वतः एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही अटक होण्याची शक्यता अ‍ॅडव्होकेट असीम सरोदे यांनी व्यक्त केली होती.

ईडीच्या चौकशीसाठी सहकार्य करायला तयार : एकनाथ खडसे

ईडीकडून एकनाथ खडसे यांचीही तब्बल ९ तास कसून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसे ईडीला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे सांगितले होते. चौकशीवेळी आम्ही सर्व प्रकारचं सहकार्य दिलंय. या चौकशीत संपत्तीची संपूर्ण चौकशी करण्यात आलीय. ईडीने स्टेटमेंट्सची सत्यता तपासलीय. याशिवाय ईडीला जे कागदपत्रे हवी होती ती सगळी दिलीत. ईडीला जेव्हा चौकशीसाठी आमची गरज लागेल तेव्हा तेव्हा आम्ही यायला तयार आहोत, असे एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी म्हटले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button