Top Newsराजकारण

काँग्रेस वगळून नव्या आघाडीसाठी ममता बॅनर्जी यांचा पुढाकार

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी काँग्रेसला वेगळे पाडून विरोधी पक्षांचा एक नवा मोर्चा साकारण्याचा प्रयत्न करीत आहेत. उच्चपदस्थ सूत्रानुसार हा मोर्चा उभा करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर, यशवंत सिन्हा यांच्याशिवाय काँग्रेसमधील ग्रुप २३ मधील काही मोठ्या नेत्यांचीही भूमिका आहे.

गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा यांच्यासह ज्या काँग्रेस नेत्यांच्या गेल्या काही दिवसात शरद पवार यांच्या निवासस्थानी ज्या बैठका झाल्या त्यात पवार यांच्याशिवाय यशवंत सिन्हांसह इतर नेते हजर होते. याच बैठकीत हा नवा मोर्चा बनविण्याची रणनीती ठरली होती.

तृणमूल काँग्रेस (टीएमसी) वेगवेगळ्या राज्यात काँग्रेस नेत्यांना बाहेर काढून आपल्या पक्षात सामील करून घेत आहे. यामागे काँग्रेसमधील ग्रुप २३ चे नेते महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. मेघालयमध्ये मुकुल संगमा यांच्यासोबत काँग्रेस जे आमदार टीएमसीसोबत गेले त्यांनी या बदलात प्रशांत किशोर यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचे मान्य केले.

उत्तर प्रदेशमध्ये ममता समाजवादी पार्टीशी फक्त १० जागांसाठी युती करीत आहे, म्हणजे नव्या मोर्चात सपालाही सामावून घेता येईल, असे सूत्रांनी म्हटले. पंजाबमध्ये ममता बॅनर्जी माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याशीही संपर्क साधत आहेत.

टीएमसीचे खासदार महुआ मोईत्रा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधकांचा चेहरा ममता बॅनर्जी असतील, असे सांगितले. टीएमसी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली भेटीनंतर बॅनर्जी शरद पवार यांची भेट घेतील. त्यात या नव्या मोर्चाच्या स्थापना प्रक्रियेला वेग दिला जाऊ शकेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button