कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, संसदेत चर्चेसाठी आणल्यागेलेल्या वीज (सुधारणा) विधेयकाविरोधात मोर्चा उघडला आहे. ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून हे विधेयक ‘जनविरोधी’ असल्याचे म्हटले आहे. तसेच यामुळे वीज महाग होईल आणि कंपन्या किंमत वाढवून नफा कमावतील, असेही म्हटले आहे. ममतांनी लिहिले, की आमच्या आक्षेपाचा विचार न करता केंद्र पुन्हा हे विधेयक आणत आहे हे ऐकून धक्का बसला आहे.
या विधेयकावर पुढे जाऊ नये, असे आवाहन करत, यावर आधी पारदर्शक चर्चा व्हायला हवी. तसेच राज्यांबरोबरही यावर चर्चा व्हावी, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर हे देशाच्या संघीय रचनेविरुद्ध आहे. तसेच, सेवा पुरवठादार वीजेचे दर वाढवतील आणि वीज महाग होईल, असेही ममतांनी म्हटले आहे.
ममता म्हणाल्या, केंद्र सरकारने संसदेत निंदनीय वीज (सुधारणा) विधेयक, २०२० सादर केल्याच्या निषेधार्थ मी हे पत्र लिहित आहे. हे विधेयक गेल्या वर्षी मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. मात्र, आमच्या पैकी अनेकांनी यांतील जनतेच्या हिताचे नसलेले पैलू समोर आणले होते. मी १२ जून २०२० रोजीही एक पत्र लिहून या विधेयकातील कमतरता आपल्या लक्षात आणून दिल्या आहेत.