ममता बॅनर्जींचा आज शपथविधी
कोलकाता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यास सज्ज झाल्या आहेत. त्या आज सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान होणाऱ्या ममता बॅनर्जींच्या शपथविधीला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता काही ठराविक लोकांनाच आमंत्रित करण्यात आलं आहे.
देशात आणि राज्यात असलेले कोरोनाचे संकट लक्षात घेता आजचा शपथविधीचा कार्यक्रम हा छोट्या प्रमाणात घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ५५ मिनिटांचा असेल. त्या आधी ममता बॅनर्जी या काली घाट या ठिकाणच्या आपल्या निवास स्थानावरून १० वाजून २५ मिनिटांनी रवाना होतील. त्यांच्यासोबत त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी आणि प्रशांत किशोर उपस्थित असतील.
सूत्रांच्या मते, आज पार पडणाऱ्या या कार्यक्रमासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, तृणमूलचे महासचिव पार्थ चटर्जी, ज्येष्ठ नेते सुब्रतो मुखर्जी, राज्याचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. या व्यतिरिक्त डाव्या पक्षाचे नेते विमान बोस, बंगाल भाजपाचे अध्यक्ष दिलीप घोष, भाजप नेते मनोज टिग्गा, काँग्रेस नेते अब्दुल मन्नान, प्रदीप भट्टाचार्य, काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरी यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. शपथविधीनंतर ममता बॅनर्जी या थेट नबन्नासाठी रवाना होतील. त्या ठिकाणी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात येईल.
ममतांना राष्ट्रपती लागवट लागू होण्याचा संशय
राज्यातील हिंसाचाराच्या घटनेवर काळजीवाहू मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, शपथ घेतल्यानंतर त्या या विषयाला सामोऱ्या जातील. मात्र राज्यात भाजपला राष्ट्रपती लागवट लागू करायची आहे, असा आरोप त्यांनी भाजपवर केला. विधानसभा निवडणुकीनंतर भाजप जातीय हिंसाचाराला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप ममता यांनी केला. दरम्यान ममता बॅनर्जींच्या कालीघाट निवासस्थानी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. यामध्ये एकंदरित बंगालमधील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. दरम्यान या हिंसाचारास टीएमसी आणि त्यांचे कार्यकर्तेच जबाबदार असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. देश कोरोनाशी लढत असताना यावेळी बंगालमधून समोर येणारी दृश्य भयावह आहेत.