
मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी ३० नोव्हेंबरला मुंबई दौऱ्यावर येणार असल्याची घोषणा केली आहे. १ डिसेंबरपर्यंत त्या मुंबईत असतील. सध्या ममता बॅनर्जी ३ दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी हा दौरा २९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आखली होता. मुंबईत त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी पक्षाच्या विस्तारात व्यस्त आहेत. तेच, काँग्रेससोबतचे त्यांचे संबंध बिघडल्याचे चिन्ह आहेत. बॅनर्जी यांच्या दिल्ली दौऱ्यात अनेक काँग्रेस नेत्यांनी त्यांची भेट घेतली आहे. तर काहींनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची दिल्लीत भेट घेणार हे अपेक्षीत होतं, मात्र सोनिया गांधींच्या भेटीबद्दल विचाचल्या ममता बॅनर्जी भडकल्या. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत भेटीवर पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी सांगितले की, मी कुणालाही भेटण्याची वेळ मागितली नाही. केवळ पंतप्रधानांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती. पंजाबची निवडणूक आहे. अशावेळी त्या व्यस्त असतील. त्यांना काम करू द्यायला हवं असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
बंगाल ग्लोबल बिझनेस समिटसाठी ३० नोव्हेंबरला मुंबईत येणार असल्याचं ममता बॅनर्जींनी सांगितलं. त्या ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत मुंबईत असतील. मुंबईत त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यासोबत, त्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. मुंबई भेट ही बिझनेस समिटसाठी असल्याचं त्या म्हणाल्या असल्या तरी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीत राजकीय चर्चा होणार हे नक्की. संजय राऊत यांच्यासारख्या ज्येष्ठ शिवसेनेच्या नेत्यांनी पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींच्या कार्याचे अनेकदा कौतुक केले आहे. शिवसेनेने नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपविरोधात तृणमूल काँग्रेसला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा दिला होता. दरम्यान, उत्तर प्रदेश निवडणुकीत समाजवादी पक्षाला मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काही दिवसात त्या वाराणसीलाही जाणार असल्याचं सांगितलं
पंतप्रधानांशी चर्चा
ममता बॅनर्जी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. जवळपास ३० मिनिटं या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. यात ममता बॅनर्जी यांनी नैसर्गिक आपत्तीनंतर नुकसान भरपाई आणि सीमा सुरक्षा दलानं राज्यात दखल या मुद्द्यावर चर्चा केली.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, सीमा सुरक्षा दला (बीएसएफ) ला जास्त ताकद दिल्यास त्याचा राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर परिणाम होईल. कायदा सुव्यवस्था राखणं ही जबाबदारी राज्याची आहे. कूचबिहारमध्ये बीएसएफनं अंधाधुंद गोळीबार केला. बीएसएफशी निगडीत अनेक घटना बंगालच्या सीमावर्ती भागात घडतात. त्यासाठी राज्य सरकारच्या संघराज्य पद्धतीत कुठलीही अडचण नको यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चर्चा झाली अशी माहिती त्यांनी दिली.
या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारकडून अद्याप ९६ हजार ५०६ कोटी रुपये नैसर्गिक संकटानंतर जाहीर केलेल्या मदतीची रक्कम पोहचली नसल्याचं सांगितले. त्रिपुरा येथील हिंसाचाराच्या घटनेवरही पंतप्रधान मोदींशी चर्चा झाली. टीएमसी कार्यकर्ता शायनी घोष यांना टार्गेट केले गेले. त्यांची अटक झाली याची माहितीही बैठकीत देण्यात आली.