मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तीन दिवसाच्या दौऱ्यासाठी मंगळवारी सायंकाळी मुंबईत दाखल होत आहेत. या दौऱ्यात बॅनर्जी या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटणार असल्याचे समजते.
पुढील वर्षी एप्रिल महिन्यात बंगालमध्ये जागतिक व्यापार परिषद भरविण्यात येणार आहे. या परिषदेत अधिकाधिक उद्योजकांनी सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न करणार आहेत. बुधवार १ डिसेंबर रोजी उद्योग जगतातील मान्यवरांशी चर्चा करणार आहेत. मंगळवारी सायंकाळी मुंबईत दाखल झाल्यानंतर सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. या दौऱ्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नाच्या स्वागत सोहळ्यालाही त्या उपस्थित राहतील. त्यानंतर रात्री उशिरा मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बुधवारी मुंबईतील उद्योगपतींशी भेटीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यानंतर शरद पवार यांची भेट घेऊन गुरुवारी कोलकात्याला परतणार आहेत.
ममता बॅनर्जी ह्या आजच मुंबईत पोहोचणार आहेत. पुढचे तीन दिवस त्यांचा तळ हा मुंबईत असेल. ह्या तीन दिवसाच्या काळात सर्वात महत्वाची राजकीय भेट असेल ती शरद पवार यांच्यासोबत. ममता बॅनर्जींच्या प्रचारासाठी शरद पवार हे पश्चिम बंगालला गेले होते आणि त्यानंतर आता ममता ह्या पवारांच्या भेटीसाठी मुंबईत असतील. गेल्या काही काळात दोन्ही नेत्यांचं काँग्रेससोबत देशपातळीवर फारसं जमून नाही. पवारांना यूपीएचं चेअरमन करावं अशी मागणी अधूनमधून उठत असते आणि त्यावर काँग्रेस नेते नाराज होतात. गेल्या आठवड्यात तर ममता बॅनर्जी ह्या दिल्लीत होत्या. त्यांनी पंतप्रधानांसह महत्वाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या पण काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधींची भेट मात्र घेतली नाही. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सोनियांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलवली होती. त्यावर ममतांच्या टीएमसीनं बहिष्कार टाकला. त्यामुळेच काँग्रेस आणि ममता यात सध्या तरी फारसं जमून नाही. त्यामुळेच मुंबई दौऱ्यात ममता ह्या फक्त शरद पवारांनाच भेटतील हे निश्चित आहे. एखाद्या काँग्रेस नेत्याची भेट अजेंड्यावर नाही. पवार-ममतांमध्ये देशपातळीवरील राजकीय निर्णयांची, मुद्यांची चर्चा होऊ शकते.
ममता बॅनर्जींच्या अजेंड्यावर दुसरी मोठी भेट असेल ती मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट. मुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये आहे. त्यामुळे ही भेट कशी होणार याबाबत साशंकता आहे. पण सामनानं दिलेल्या वृत्तानुसार उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांची भेट होणार आहे. नरेंद्र मोदी सरकारच्याविरोधात गेल्या दोन एक वर्षात जर कुणी पाय रोवून उभं ठाकलं असेल तर ते आहेत ममता बॅनर्जींची टीएमसी आणि ठाकरेंची शिवसेना. दोन्ही ठिकाणी केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन राज्य सरकारांना नामोहरम करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत असल्याचा आरोप केला जातोय. पण तरीही ठाकरे-बॅनर्जींनी भाजपला जशास तसं उत्तर दिलंय. त्याच पार्श्वभूमीवर ह्या दोन्ही नेत्यांची भेट महत्वाची मानली जातेय.