नवी दिल्ली: सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनादरम्यान मंगळवारी भाजपच्या संसदीय दलाची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. यावेळी मोदींनी अधिवेशनात गैरहजर राहणाऱ्या भाजप खासदारांना कडक शब्दात इशारा देत हिवाळी अधिवेशनात आणि पक्षाच्या महत्वाच्या बैठकांमध्ये उपस्थित राहण्याचा सल्ला दिला आहे.
यावेळी गैरहजर खासदारांना उद्देशून नरेंद्र मोदी म्हणाले, मी तुम्हाला नेमहीच संसदेत उपस्थित राहण्यास सांगत असतो. तुमच्या अनुपस्थितीमुळे कामांवर परिणाम पडतो. यापुढे सर्व खासदारांनी नियमितपणे संसदेत आणि पक्षाच्या महत्वाच्या बैठकांना उपस्थित राहावे. लहान मुलाप्रमाणे सतत सांगणे मला आवडत नाही. तुम्ही स्वतःमध्ये बदल केला नाही, तर भविष्यात मला तुमच्या संदर्भात मोठा बदल करावा लागेल, अशा कडक शब्दात मोदींनी गैरहजर खासदारांना इशारा दिला आहे.
बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सर्व खासदारांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनानंतर आपापल्या मतदारसंघात जाऊन जिल्हाध्यक्ष आणि इतर स्थानिक नेत्यांशी संवाद साधण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, स्थानिक पातळीला पक्ष मजबूत करण्यासाठी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाये आयोजन करण्यास सांगितले आहे. याच अनुषंगाने येत्या १४ डिसेंबर रोजी नरेंद्र मोदी त्यांचा मतदारसंघ असलेल्या बनारसमध्ये सर्व भाजप नेत्यांना चाय पे चर्चा कार्यक्रमासाठी बोलवणार आहेत.
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांना खासदार क्रीडा स्पर्धा, खासदार फिटनेस चाइल्ड स्पर्धा, सूर्यनमस्कार स्पर्धा यांसारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यास सांगितले आहे. तसेच आपापल्या भागात राहणाऱ्या पद्म पुरस्कार विजेत्यांशी संपर्क ठेवणे आणि त्यांच्याशी सतत संवाद साधण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. पंतप्रधानांच्या या इशाऱ्याचा आणि सल्ल्याचा गैरहजर खासदारांवर काय परिणाम होतो, हे येत्या काळात दिसेलच.
विशेष म्हणजे, नरेंद्र मोदी यांनी आपल्या पक्षाच्या खासदारांना अशावेळी इशारा दिला, जेव्हा अधिवेशनात विरोधक एकजूट होवून सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहेत. नागालँड गोळीबार, खासदारांचे निलंबन यासह विविध मुद्द्यांवर विरोधकांकडून सरकारला घेरले जात आहे. यापूर्वीही संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेत भाजप खासदारांच्या अनुपस्थितीच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त केली होती.