महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या सात वर्षात अनेक नवीन विशेषणे जन्माला आली आहेत.चंपा,पप्पू,टरबूज्या,फेकू,मोटाभाय,गोडबोल्या,ढेरपोट्या,दादा,भाई आणि आता मायचा लाल….बरं वाटतं ना, ही अशी विशेषणे ऐकायला. पूर्वी काळी महात्मा, पंडित,सरदार,राष्ट्रपिता, जाणता राजा, महर्षी, अशी विशेषणे, प्रचलित होती, ती आता भूतकाळात जमा झाली आहे. बदल व परिवर्तन,ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे व ती मानवी जीवनात अपरिहार्य आहे.त्यानुसार होणारे हे बदल आता तुम्ही-आम्ही सर्वजण स्विकारू लागलो आहोत.
सध्या ” मायचा लाल ,” या शब्दाची चर्चा मोठ्याप्रमाणात का होऊ लागली आहे,ते पाहूया… मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी,पंढरपुरात असा कोण ” मायचा लाल,” निवडून येईल ? अशी दर्पोक्ती केली होती.पण पंढरपूरकरानी समाधान अवताडे यांच्या रूपाने ” मायचा लाल,” जन्माला घातला व अजित पवार तोंडघशी पडले. या अशा आतताईपणाला आपण ” फाजील आत्मविश्वास,” म्हणतो,आणि तो अजित पवार यांच्या नसानसात भिनला आहे.सार्वजनिक जीवनात वावरताना उच्च पदावरील व्यक्तींनी कसे वागावे,याबाबत काही नॉर्मस आहेत,पण अजित पवार यांना ते कधीही मान्य नव्हते.त्यामुळे ” धरणात आम्ही मुतायचे का “? असा प्रश्न विचारणाऱ्या या वाचाळ नेत्यावर राजीनामा देण्याची व कृष्णेकाठी आत्मशुद्धीकरणासाठी उपोषण करण्याची पाळी आली.अर्थात हे सारे नाटक होते.
प्रचारात नको ती वक्तव्ये केल्यामुळेच राष्ट्रवादीच्या भालके याना पराभव चाखावा लागला.अर्धे मंत्रिमंडळ पंढरपुरात ठाण मांडून बसले होते.पण या नेत्याचा उन्माद,उर्मट,उद्दामपणामुळे पंढरपूरकरानी त्यांना त्यांची जागा दाखवली.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शरद पवारांसारखे पावसात यथेच्छ भिजले देखील,पण विजयाने त्यांना हुलकावणी दिलीच. पंढरपूरकरानी केलेल्या न्यायनिवाड्याने महाविकास आघाडी सरकारच्या दीड वर्षाच्या कारकीर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.अवताडे यांच्या या विजयानंतर भाजपचा आत्मविश्वास दुणावला असून आ.पडळकर,विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून सरकारवर प्रखर हल्ले सुरू झाले आहेत.