राजकारण

महाविकास आघाडीच्या अजून दहा लोकांना जेलमध्ये पाठवणार : सोमय्या

पिंपरी : राज्यातील ठाकरे सरकार आता नौटंकी करत आहे. पवार साहेब कुणा – कुणासाठी हिशोब मागणार, ही तर सुरवात आहे. अजून दहा लोकांना आम्ही जेलमध्ये पाठवणार आहोत, विधीमंडळाचे अधिवेशन चालू दिल्यास आम्ही सरकारवर अविश्वास ठराव दाखल करू, अशी टीका भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यातील मंत्र्यांवर टीका करताना सोमय्या म्हणाले, महाराष्ट्रात नटसम्राट एकच होता, पण ते पद आता ह्यांना द्यावं लागेल. बहीण नाही तर अजित पवारांनी आपल्या आईच्या नावावरही बेनामी इस्टेट जमा केली केली आहे. तसेच भावना गवळी यांनी सरकारचे ४४ कोटीं ढापले, आनंदराव अडसूळ यांनी १०० कोटींचा घोटाळा केला. त्यासाठी त्यांना नोटिसा दिल्या गेल्यात. यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार काहीच का बोलत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्नीच्या नावे १९ बंगले बांधले आहेत. खासदार संजय राऊत यांनी बेनामी ५५ लाख परत करून माफी मागितली आहे. जालना सहकारी साखर कारखाना घोटाळा प्रकरण उघडकीस आले आहे. कारखान्याचे मालक अर्जुन खोतकरच असल्याचे पुरावे दिले आहेत. पवार साहेब कुणा-कुणासाठी हिशोब मागणार, ही तर सुरूवात आहे. अजून दहा लोकांना आम्ही जेलमध्ये पाठवणार आहोत, विधीमंडळाचे अधिवेशन चालू दिल्यास आम्ही सरकारवर अविश्वास ठराव दाखल करणार आहोत.

पिंपरी-चिंचवड शहरात भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या आले होते. त्यावेळी त्यांनी टीका केली. यावेळी शहराध्यक्ष महेश लांडगे, महापौर उषा ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर हिराबाई घुले, प्रदेश महिला अध्यक्षा उमा खापरे, प्रवक्ते अमोल थोरात आदी उपस्थित होते.

शरद पवारांच्या दोन निकटवर्तीयांना ईडीची नोटीस

अजित पवारांना अटक होणार, ते जेलमध्ये जाणार असा छातीठोक दावा करणारे भाजप नेते किरीट सोमय्यांनी रविवारी आपल्याच विधानावरून यू टर्न घेतल्याचे पाहायला मिळाले. जेलमध्ये जाणे म्हणजे कारवाई होणे, असा शोध लावत त्यांनी शब्दशः अर्थ घेऊ नका, असे आवाहन केले. मात्र, शरद पवारांच्या दोन निकटवर्तीयांना नोटीस दिल्याचा दावा त्यांनी केला. शिवाय शरद पवारांना नेमकी कशाची भीती वाटतेय, असा सवालही सोमय्यांनी केला.

यावेळी त्यांनी शरद पवारांवरही शरसंधाण साधले. ते म्हणाले, पवारांना एवढे प्रेम अजित पवारांबद्दल उफाळून आले आहे की, अनिल देशमुखांबद्दल. कंपन्यांच्या धाडीनंतर १ हजार ५० कोटीची रक्कम बाहेर आली आहे. पवारांचा उजवा आणि डावा हात जगदीश कदमांना ईडीनं दोन नोटीस पाठवली आहे. १०० कोटीची वसुली कशी केली, याचा हिशेब राजेंद्र पाटोळे आणि जगदीश कदमांनी दिला आहे. मग पवारांना त्याची भीती आहे का, त्यांना नेमकी कोणाची काळजी आहे, असा सवाल सोमय्यांनी केला.

अजित पवार जेलमध्ये जाणार का, असे विचारले असता सोमय्यांनी यू टर्न घेतला. ते म्हणाले, जेलमध्ये जाणे म्हणजे कारवाई होणे. प्रताप सरनाईक जेलमध्ये गेले नाहीत, पण त्यांची ७८ एकर जमीन जप्त झाली ना. आपण शब्दप्रयोग वापरतो. सगळेच जेलमध्ये जात नसतात आणि जेलही टाकत नसते, असे सांगायला ते विसरले नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button