राजकारण

जळगाव जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचे वर्चस्व; राष्ट्रवादी ११, शिवसेना ७, तर काँग्रेसला २ जागा

धुळे नंदुरबार जिल्हा बँक निवडणुकीत भाजप खा. सुभाष भामरेंना धक्का, भावाचा पराभव

जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय पाहायला मिळाला. २१ जागांपैकी ११ जागा राष्ट्रवादी काँग्रेस, ७ जागांवर शिवसेना, २ जागांवर काँग्रेस आणि एका जागेवर भाजप उमेदवार विजयी झालाय. तर एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचाही एकतर्फी विजय झाला आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वाश्रमीचे भाजप आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आनंद व्यक्त केलाय. तसंच माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर खडसे यांनी जोरदार टीका केलीय.

मी ४० वर्षे भाजप रुजवण्याचा प्रयत्न केला. मात्र ४० वर्षे माझी अवहेलनाच केली गेली. पुढच्या कालखंडात नगरपालिका आणि जिल्हा परिषद आमच्या ताब्यात येईल. इतक्या वर्षात गिरीश महाजन हे त्यांच्या मतदारसंघात जाऊ शकले नाहीत. नेते होऊ शकले नाहीत. इतकी वर्षे संघर्ष, आंदोलन, भाषणं मी करत होतदो. नाथाभाऊंना कुणीतरी स्पर्धक म्हणून गिरीष महाजनांना मोठं केलं जातंय. आतापर्यंत महाजनांना मीच मदत करत आलो. सरपंच होते तेव्हा पक्षाच्या माध्यमातून आर्थिक मदतही मीच करत आलो. पक्षात नाथाभाऊ मोठे होत आहेत. मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होत आहेत, म्हणून काही नेत्यांनी महाजनांना मोठं केलं, अशा शब्दात खडसे यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

महाजनांमध्ये निवडणूक लढवण्याची हिंमत नव्हती

जिल्हा बँकेच्या विजयाबद्दल बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, मागील सहा वर्षांपूर्वी जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक क वर्गात होती. आता ती अ व्रगात आली. बँकेचा संचित तोटा आम्ही कमी केला. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न केला. त्याचे फलित म्हणून निवडणुकीत विजय झाला. गिरीश महाजन यांच्यात निवडणूक लढवण्याची हिंमत नव्हती. म्हणून त्यांनी पळ काढला. कदाचित अपयश येईल, याची जाणीव त्यांना झाली होती, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.

जिल्हा बँक ताब्यात, आता नगरपालिका व जि.प.वर लक्ष

आता जिल्हा बँकेवर विजय मिळवून दाखला. भविष्यात नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतदेखील विजय मिळवणार असल्याचा आत्मविश्वास खडसे यांनी व्यक्त केला.

धुळे नंदुरबार जिल्हा बँक निवडणुकीत भाजप खा. सुभाष भामरेंना धक्का, भावाचा पराभव

धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये तीन माजी आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. परंतु या तीनही माजी आमदारांनी आपला गड राखत दणदणीत विजय मिळवला आहे. यामध्ये नंदुरबारचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी त्याचबरोबर धुळ्याचे माजी आमदार शरद पाटील तसेच माजी आमदार राजवर्धन कदमबांडे या तीनही माजी आमदारांनी विजय मिळवला आहे. धुळ्याचे खासदार सुभाष भामरे यांना या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. सुभाष भामरे यांच्या भावाला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

धुळे जिल्हा बँकेच्या १० जागांसाठी मतदान झालं होतं. भाजप नेते माजी संरक्षण राज्यमंत्री तथा खासदार सुभाष भामरे यांचे भाऊ सुरेश रामराव पाटील यांचा पराभव झाला आहे. सुभाष भामरे यांना चांगलाच धक्का मानला जातो आहे. माजी आमदार शरद पाटील यांनी सुभाष भामरे यांच्या भावाचा पराभव केला आहे.

निवडणुकीदरम्यान भाजप, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचे बघायला मिळाले. तर. शिवसेनेने मात्र वेगळी चूल मांडल्यामुळे यामध्ये सर्वपक्षीय आघाडीत शिवसेनेतर्फे बिघाडी करण्यात आल्याची चर्चा आहे. भाजपच्या आठ उमेदवारांचा विजय झाला असून इतर नऊ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत.

धुळे नंदुरबार जिल्हा बँक निवडणुकीमध्ये माजी मंत्री तथा आमदार अमरीश भाई पटेल यांनीदेखील या निवडणुकीत चांगलाच जोर लावला होता. तसेच माजी आमदार राजवर्धन कदम बांडे यांच्या शेतकरी विकास पॅनलचे सर्वाधिक उमेदवार असल्याकारणाने धुळे-नंदूरबार जिल्हा बँकेच्या सत्तेची चावी पुन्हा एकदा राजवर्धन कदमबांडे यांच्याच हातात जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या नऊ मतदार संघातील 17 जागांसाठी काल निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. १७ पैकी १० जागांसाठी मतदान झालं होतं. १७ पैकी ७ जागांवर बिनविरोध निवड झाली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button