महात्मा गांधींच्या पणतीला ३.२२ कोटींच्या फसवणूक प्रकरणी ७ वर्षांची शिक्षा
डर्बन : महात्मा गांधी यांच्या पणती आणि प्रसिद्ध मानवी हक्क कार्यकर्त्या इला गांधी यांची मुलगी असलेल्या आशिष लता रामगोबीन यांना दक्षिण आफ्रिकेच्या डर्बनच्या न्यायालयाने आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ५६ वर्षीय आशिष लता रामगोबीन यांच्यावर एसआर महाराज या व्यापाराला ६.२ मिलियन रॅन्ड म्हणजे ३.२२ कोटी रुपयांना फसवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
आशिष लता रामगोबीन यांनी एका व्यवहाराच्या आयातीसाठी आणि सीमा शुल्कासाठी ही रक्कम देण्यात आली होती. तसेच या व्यवहारात जो काही फायदा होईल त्याचाही हिस्सा संबंधित व्यापाराला दिला नसल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
आशिष लता रामगोबीन या प्रसिद्ध मानवी हक्क इला गांधी आणि दिवंगत मेवा रामगोविंद यांच्या कन्या आहेत. दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या फिनिक्स या आश्रमाचे पुनुरुज्जीवन करण्यामध्ये त्यांचा महत्वपूर्ण वाटा होता. आशिष लता रामगोबीन यांच्या विरोधात २०१५ साली या खटल्याची सुरुवात झाली होती. भारतातून आफ्रिकेला येणाऱ्या काही मालावरच्या आयात आणि सीमा शुल्काची रक्कम भरायला पैसे हवे असं सांगत आशिष लता रामगोबीन यांनी संबंधित व्यापाऱ्याकडून पैसे घेतले होते. त्यावेळी या मालासंबंधी सर्व कागपत्रेही दाखवण्यात आली होती. या व्यवहारात जो काही नफा होईल त्यामध्येही संबंधित व्यापाऱ्याला वाटा देण्याचं आशिष लता रामगोबीन यांनी कबुल केलं होतं. त्यानंतर एका महिन्यानंतर त्या व्यापाऱ्याच्या असं लक्षात आलं की, या मालाची आयात झाली आहे, त्याचे सीमा शुल्कही भरले आहे पण त्यांना त्याचे पैसे मिळाले नाहीत. मग त्या व्यापाऱ्याने आशिष लता रामगोबीन यांच्या विरोधात खटला दाखल केला.