मुक्तपीठ

महाराष्ट्राचे राजकारण तिस-या लाटेवर स्वार…

- विजय चोरमारे

कोविडच्या तिस-या लाटेवर स्वार होऊन महाराष्ट्राचे राजकारण रंगात आले आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. हंड्या फुटू लागल्या आहेत. रंगपंचमीवर बंदी असल्यामुळे चिखलफेक सुरू आहे. आमच्यावर बंधने आणि तुम्ही मात्र मोकाट असे आरोप केले जात आहेत. या गोंधळात सामान्य माणूस मात्र संभ्रमात सापडल्यासारखा झाला आहे. तिसरी लाट येणार म्हणतात ते खरे की, लाट वगैरे थोतांड आहे म्हणतात ते खरे असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.

काय आहे तिस-या लाटेची वस्तुस्थिती ?

जागतिक आरोग्य संघटनेसह आरोग्य क्षेत्रातील इतरही आंतरराष्ट्रीय संघटनांकडून वारंवार महामारीच्या लाटांचा उल्लेख केला जातो. पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट वगैरे. एका लाटेचा उल्लेख केला जातो तेव्हा त्यामध्ये संबंधित आजाराचे रुग्ण, त्यांची वाढत वाढत एका विशिष्ट उंचीपर्यंत जाणारी आणि पुन्हा कमी कमी होत येणारी संख्या या सगळ्या बदलांचा समावेश असतो. विशिष्ट काळातील रुग्णसंख्येतील चढउतार, रुग्णसंख्येचा उद्रेक आणि त्यांचे किमान पातळीवर येणे म्हणजे लाट.

सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी पहिल्यांदा १८००च्या दशकाच्या अखेरच्या काळात आणि नंतर १९१८ ते १९२९च्या स्पॅनिश फ्लूमध्ये इन्फ्लूएंझाच्या उद्रेकाच्या काळात लाट या संकल्पनेचा पहिल्यांदा वापर केला होता. या ऐतिहासिक महामारीच्या काळातील निरीक्षणे आणि नोंदींचा वापर आजसुद्धा मोठ्या साथीच्या काळात एखाद्या मॉडेलसारखा केला जातो. कोविड-१९च्या काळातही तज्ज्ञांनी याच मॉडेलच्या आधारे साथीचा चढउतार कसा असू शकेल यासंदर्भातील निष्कर्ष मांडले. आणि आतापर्यंत तरी ते निष्कर्ष बरोबर ठरत आले आहेत.

१९१८मधील इन्फ्लूएंझा महामारी तीन लाटांमध्ये आली आणि इतिहासातील सर्वात गंभीर महामारी होती. त्यामुळे स्वाभाविकच आजच्या काळातही अनुमान काढण्यासाठी त्याचाच आधार घेतला जातो. या महामारीच्या काळात जगभरात सुमारे पाच कोटीहून अधिक लोकांचे मृत्यू झाले होते.त्यावेळी भारतातील मृत्यूंची संख्या सव्वा ते दीड कोटींच्या जवळपास होती. एकूण लोकसंख्येचा पाच टक्के. त्यावेळी अमेरिकेत फ्लूसारख्या आजाराचा पहिला उद्रेक मार्चमध्ये आढळला होता. कॅन्ससमध्ये शंभरहून अधिक रुग्ण आढळून आले होते. १९१८मध्ये अमेरिका पहिल्या महायद्धात गुंतली होती. युद्धासाठी तैनात हजारो अमेरिकन सैनिकांनी अटलांटिक ओलांडून प्रवास केल्यामुळे फ्लूचा जगभर प्रसार झाला होता. नोंद घेण्याजोगी बाब म्हणजे पहिल्या महायुद्धामध्ये जी एकूण लष्करी आणि अन्य मनुष्यहानी झाली, त्याहून कितीतरी अधिक लोकांचे बळी या साथीमध्ये गेले होते. या साथीची दुसरी लाट उन्हाळा आणि हिवाळ्याच्या दरम्यान म्हणजेच सप्टेंबर ते डिसेंबरच्या दरम्यान आली होती.

मार्च १९१८मध्ये सुरू झालेल्या आणि १९१९च्य उन्हाळ्यापर्यंत चाललेल्या या साथीच्या काळात तीन वेगवेगळ्या लाटा होत्या. उन्हाळा आणि हिवाळ्यादरम्यानच्या दुस-या लटेत साथ शिगेला पोहोचली होती. या काळात प्रचंड संख्येने मृत्यू झाले. हिवाळा आणि वसंत ऋतुच्या दरम्यान तिसरी लाट आली आणि या लाटेने मृत्यूंच्या संख्येत आणखी भर घातली. १९१९च्या उन्हाळ्यात तिसरी लाट शमली.

त्यानंतरही साथीचे काही आजार आले. प्रत्येक साथीची तीव्रता कमीजास्त होती, प्रदेशनिहाय वेगवेगळी स्थिती होती. अशा महामारीच्या काळातील परिस्थितीचा अभ्यासही वैद्यकीय तज्ज्ञांनी वेळोवेळी केला आहे. आणि भूतकाळातील या अभ्यासांच्या आधारेच करोनांच्या लाटांसंदर्भात अनुमान मांडले जात आहेत. सप्टेंबरच्या दुस-या आठवड्यात कोविडची तिसरी लाट येणार हे सांगितले जाते, त्यामागे तोच शास्त्रीय आधार आहे. कुणातरी राज्यकर्त्याला वाटले, कुणाला तरी काहीतरी अवैध कामे रेटून न्यायची आहेत म्हणून कोविडच्या लाटेची भीती घातली जात नाही. परंतु शास्त्रीय आधारावर मांडलेल्या निष्कर्षांना खोटे ठरवून स्वतःचा राजकीय अजेंडा चालवणारी मंडळी अत्यंत स्वार्थी आणि लोकविरोधी आहेत, हे ठामपणे सांगायला हवे. राजकीय स्वार्थासाठी ही मंडळी लोकांच्या जिवाशी खेळत आहेत आणि हे अत्यंत क्रूर आहे.

साथीच्या तीव्रतेच्या काळात मंदिरे नको, हॉस्पिटल बांधा यासारखे मेसेज फॉरवर्ड करणारी मंडळी साथीचा जोर कमी झाल्यावर पुन्हा घंटा वाजवू लागली आहेत. कुणी काय वाजवावे हा ज्यांचा त्यांचा प्रश्न. परंतु शास्त्रशुद्ध अभ्यासाच्या आधारे मांडलेल्या निष्कर्षांना खोटे ठरवून शहाणपणा पाजळणा-यांना एवढेच सांगावे वाटते, की बाबाहो तुमची दुकाने कायमची बंद झालेली नाहीत. फक्त दोन महिने धीर धरा. सप्टेंबर आणि ऑक्टोबर. फारफारतर नोव्हेंबर अखेरपर्यंत. तिस-या संभाव्य लाटेकडे दुर्लक्ष करणे कदाचित तुम्हालाच महागात पडेल.

दुसरी लाट येणार असं तज्ज्ञ सांगत होते, परंतु पहिली लाट ओसरल्यानंतर करोना गेला म्हणून उन्मादाने बाहेर पडल्यानंतर काय झाले, हे आपण अनुभवले आहे. आपल्या अवतीभवती वावरणारी चांगली चांगली पैसेवाली म्हटली जाणारी माणसंही ऑक्सिजनअभावी तडफडून मरताना पाहिली. आतापर्यतं कोविडनं देशात चार लाखाहून अधिक बळी घेतले आहेत. पहिल्या लाटेत सुमारे दीड लाख आणि दुस-या लाटेत अडीच लाख लोकांना प्राण गमावावे लागले आहेत. राज ठाकरेंना घरात बसून दहीहंडी जोरात करा म्हणायला काही बिघडत नाही. तुम्ही मोठा उत्सव करा, तिथं मी स्वतः किंवा माझा मुलगा येईल, असं ते म्हणाले असते तर त्यांच्या बोलण्याला काही अर्थ होता. थर लावणा-या गरिबांच्या पोरांना चिथावणी देणं शौर्याचं लक्षण नाही. अशामुळं त्या पोरांचं करिअर बाद होतं. राज ठाकरेंच्या आंदोलनांमुळं अशा शेकडो पोरांचं आयुष्य बरबाद झालं आहे. गेल्यावर्षीचंच उदाहरण घेतलं तर मुंबईत गणपतीच्या काळात लोकांचं एकमेकांच्या घरी जाणं येणं फिरणं वाढलं आणि त्यामुळं साथीचा उद्रेक झाल्याचं आपण पाहिलं आहे.

प्रश्न लोकांच्या जगण्या-मरण्याचा आहे. दीड वर्षे आपण सहन करतोय. आणखी दोन महिने संयम पाळायचा आहे फक्त. व्यवहार सुरू आहेत. बाकी काही नाही फक्त गर्दी टाळायची आहे.

टाळेबंदीच्या काळात व्यवहार बंद ठेवण्याच्या विरोधात मी सुरुवातीपासून भूमिका मांडत आलो आहे. लॉकडाऊन गरीबविरोधी आहे. मंत्रालयातल्या बाबूंच्या सल्ल्यानं चालणारे सरकार केवळ लोकविरोधी फतवे काढते आणि पोलिस काठ्या आपटत त्याची अंमलबजावणी करतात. त्यातल्या अनेक गोष्टी अव्यवहार्य असतात. सरकार अनेक बाबतीत जबाबदारी झटकत असते. कोविड काळात धंदा बसलेल्या छोट्या व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी आवश्यक संवेदनशीलता महाराष्ट्र सरकारने दाखवलेली नाही. योगायोगाने नारायण राणे यांच्याकडे सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग खाते आले होते, त्यांना मोठी संधी होती, परंतु त्यांनी ती वाया घालवली. लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याची शहरे आणि फारतर गर्दी होतील अशा तालुक्याच्या मोठ्या शहरांमध्येच लॉकडाऊन सक्तीचा करायला पाहिजे. गावोगावचे आठवडा बाजार आणि यात्रा बंद ठेवणे समजू शकते. परंतु आवश्यकता नसताना खेडोपाडीही व्यवहार बंद ठेवण्याची सक्ती केली जाते आणि त्यामुळे हजारो लोकांवर उपासमारीची पाळी येते. खेडोपाडी कुठंही दुकानात, हॉटेलात गर्दी होत नसते.त्यामुळं विनाकारण निर्बंध घालून माणसांचं जगणं अवघड करण्याचं कारण नाही. सरकारी पातळीवरून किमान व्यावहारिक शहाणपण दाखवले तर लॉकडाऊनमुळे सामान्य माणसांच्या जगण्याची जी परवड होते, त्याची तीव्रता निम्म्याने कमी करता येऊ शकते. परंतु अगदी सुरुवातीला नरेंद्र मोदींनी चार तासांचा अवधी देऊन जाहीर केलेल्या लॉकडाऊनपासून जी सरकारी पातळीवरून गरिबांची परवड सुरू झाली आहे, ती थांबवण्यासाठी कुणीही प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत नाही.

परिस्थिती कठीण आहे, हे खरे असले तरी अजून दोन महिने संयम आवश्यक आहे. विरोध मंदिरांना नाही, तर तिथे होणा-या गर्दीला आहे. विरोध दहीहंडीला नाही, तर त्यानिमित्तानं होणा-या गर्दीला आहे. परंतु हे लक्षात न घेता राजकीय दुकानदारी चालवण्यासाठी आततायीपणा केला जातो. एकजण यात्रा काढतो म्हणून दुसरा मेळावा घेतो. तिस-याने मोर्चा काढला म्हणून चौथा रस्त्यावर उतरून राडा करतो. आणि सगळे मिळून लोकांना गर्दी न करण्याचे आवाहन करतात. जबाबदारी प्रत्येकाची आहे. सरकारची. राजकीय पक्षांची. त्याहीपेक्षा प्रत्येक व्यक्तिची. ऑक्सिजनसाठी टाचा घासण्याची वेळ येते तेव्हा कुणीही जवळ नसतं, हे लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button