Top Newsआरोग्य

महाराष्ट्र होणार मास्कमुक्त?; टास्क फोर्सच्या निर्णयानंतर धोरण जाहीर होणार

मुंबई : गेल्या दोन वर्षापासून सगळं जग ज्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे, त्यातून सुटका होण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. कोरोनाचा विळखा हळूहळू सैल होत आहे. यामागे सर्वात महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे लसीकरण. कोरोनाला प्रतिबंध करणारी लस निर्माण झाल्यानंतर जगभरात सर्वत्र लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. अनेक देशांमध्ये अत्यंत वेगाने लसीकरण पूर्ण झालं असल्यानं तिथली जनता मास्क आणि अन्य कठोर निर्बंधातून मुक्त झाली आहे. राज्यात देखील मास्कपासून सुटका होण्याची शक्यता आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीत मास्क संदर्भात चर्चा करण्यात आली आहे.

कोट्यवधी लोकं कोरोनाच्या विळख्यात अडकली तर लाखो लोकांचा जीव कोरोनानं घेतला आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी त्रिसुत्रीचा वापर करावा असं वारंवार प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. या त्रिसुत्रांमध्ये मास्क परिधान करणे, सोशल डिस्टेंसिंगचं पालन करणे आणि वारंवार हात धुणे या गोष्टी काळजीपूर्वक केल्यास कोरोना होण्याचा धोका कमी असतो. त्यामुळे जगभरात तसेच भारतातही लोकं मोठ्या प्रमाणात मास्कचा वापर करत असल्याचं दिसून येते. मास्कचा वापर बंधनकारक असल्याने कुणीही मास्क परिधान न केल्यास त्याच्यावर दंडाची कारवाई करण्यात येते. परंतु महाराष्ट्र आता मास्कमुक्त होणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. बुधवारच्या कॅबिनेट बैठकीत मास्कबाबत चर्चा झाली. जगातील काही देशांनी मास्कवरील बंधनं हटवलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ही चर्चा करण्यात आली. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरु आहे. भारतातही कोट्यवधी लोकांचे लसीकरण पूर्ण झालंय. अशावेळी कठोर निर्बंध आणि मास्कच्या बंधनातून काही देशांनी मुक्तता केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही मास्कपासून सुटका होण्याची शक्यता आहे.

अनेक देशांमध्ये ही स्थिती येण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. कारण जोपर्यंत लसीकरण मोठ्या प्रमाणावर होत नाही तोपर्यंत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध पाळणे आवश्यक आहे. आपल्या देशातही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवण्यात येत असून अतिशय वेगानं लसीकरण पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. राज्यात आतापर्यंत १४ कोटी ६९ लाख ५७ हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे. यामध्ये ६ कोटी ३ लाख १२ हजार २४० नागरिकांनी दुसरा तर ८ कोटी ५९ लाख १७ हजार ३७ जणांना पहिला डोस देण्यात आला आहे. हा महत्त्वाचा टप्पा पार केल्यानंतर आपलीही मास्कपासून सुटका होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळच्या बैठकीत मास्क संदर्भात लवकरच टास्क फोर्सशी चर्चा करण्यात येणार आहे. टास्क फोर्सच्या निर्णयानंतर मास्क बाबतीत धोरण जाहीर होणार आहे. राज्यातील सर्वसामान्य जनता मोठ्या आशेने त्या दिवसाची वाट पाहत आहे.

संपूर्ण लसीकरण झालेल्या लोकांना मास्क न घालण्याची परवानगी देणारा इस्रायल हा जगातील पहिला देश होता. इस्रायल अत्यंत वेगवान लसीकरण मोहीम राबवून जनतेला मास्कमुक्त केले, पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान पसरलेल्या कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकारामुळे,रुग्ण संख्या वाढू लागल्यानं तिथं पुन्हा मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले. आज जगात मास्क घालण्यापासून मुक्तता झालेल्या देशांमध्ये ब्रिटन , अमेरिका, स्वीडन, चीन, न्यूझीलंड, हंगेरी, इटली यांचा समावेश आहे. अलीकडेच सौदी अरेबियानेहीलसीकरण पूर्ण झालेल्या लोकांना मास्क न घालण्याची परवानगी दिली आहे. ज्या देशांमध्ये ५० टक्क्यापेक्षा जास्त लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्या देशांनी लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांची मास्कमधून सुटका केली आहे. अमेरिकेनं तर ३७ टक्के लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण केल्यानंतर जनतेला मास्क न घालण्याची परवानगी दिली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button