१० ची परीक्षा रद्द, तर १२ वीची लांबणीवर
मुंबई : कोरोनामुळे यंदा दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार असल्या तरी त्या लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत दहावी परीक्षा रद्द करण्याबाबत आणि बारावीच्या परीक्षा घेण्याबाबत एकमताने निर्णय झालेला आहे. याबाबत सविस्तर माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड माहिती देतील.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, कोरोना वाढत असल्याचे पाहून १२ एप्रिलला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. त्या बैठकीत दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला होता. यासंदर्भात आम्ही इतरही बोर्डाला सांगितले होते आणि परीक्षाबाबत निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला की, दहावीच्या परीक्षा रद्द कराव्यात आणि बारावीच्या परीक्षा घ्याव्यात. याचप्रमाणे राज्य सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनानुसार पास करण्यावर आम्ही चर्चा करून अंतिम निर्णय देणार आहोत.
बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेण्याचे प्रयत्न राज्य सरकार करत आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय जाहीर केला.