राज्यात कोरोनाचा विस्फोट; ठाकरे सरकारचे नवे निर्बंध जाहीर
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागू करणार का? अशी शक्यता व्यक्त केली जात असताना राज्य सरकारने कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी नव्या गाइडलाइन्स लागू केल्या आहेत. यानुसार यापुढे राज्यातील सर्व नियमावली अधिक कडक करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या 15 हजारांहून अधिक आढळत असल्याने ठाकरे सरकारने कडक कारवाई करण्याचं आदेश दिले आहेत.
राज्यातील सर्व रेस्टॉरंट, थिएटर्स (सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्लेक्स) 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. मात्र यावेळी नियम अधिक कडक करण्यात आले असून मास्क शिवाय कोणालाही आत येण्याची परवानगी नसेल. याशिवाय आस्थापनांमध्ये ठिकठिकाणी सॅनिटायजर लावणं ही बंधनकारक करण्यात आलं आहे. दरम्यान नियमांचं उल्लंघन केल्यास कोरोना महासाथ जाईपर्यंत ते रेस्टॉरंट किंवा थिएटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असंही गाइडलाइन्समध्ये जारी करण्यात आलं आहे. याशिवाय शॉपिंग मॉल्सनाही हे नियम अनिवार्य राहतील.
महत्त्वाचं म्हणजे राज्यातील सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. लग्न समारंभासाठी 50 लोकांना परवानगी असेल, तर अत्यंसंस्कारात 20 पेक्षा जास्त जणांना परवानगी नाही.
मुंबईसह महाराष्ट्रात मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहायला मिळाले आहे. याच पार्श्वभूमीवर, नागरिकांनी आता अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले. तसेच वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली होती. कोरोना संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली असली तरी त्या तुलनेत मृत्युदर कमी असल्याचे टोपे म्हणाले. त्याचवेळी त्यांनी राज्यातील जनतेला कोरोना नियमांचे पालन करुन सहकार्य करण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्रात लसीकरणाला मोठ्या प्रमाणावर गती देण्यात आली असून दररोज किमान सव्वा लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. राज्यामध्ये लसीचा तुटवडा नसून खासगी आणि शासकीय रुग्णालयात लसीकरणाचे प्रमाण वाढवण्याकरिता प्रयत्न केले जात असल्याचे सांगतानाच ६० वर्षांवरील सर्व नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहनही टोपे यांनी केले.