आशा भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर
मुंबई : आपल्या जादूई आवाजाच्या जोरावर गेली कित्येक दशकं रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना २०२० या वर्षीचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले. महाराष्ट्र भूषण’ हा महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित असा पुरस्कार मानला जातो. एखाद्या क्षेत्रात बहुमुल्य कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वास या पुरस्कारानं गौरवण्यात येतं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीस समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि सदस्य सचिव सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे हे शासकीय सदस्य तसेच अशासकीय सदस्य सहभागी झाले होते. निवडीनंतर मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन केले.
अजूनही रसिकांच्या मनावर अधिराज्य
आशा भोसले यांनी गाण्याच्या माध्यमातून अनके दशकं मराठी तसेच देशवासियांच्या मनावर राज्य केले. अजूनही त्यांची गीतं तेवढ्याच तन्मयतेने आणि अभिरूचीने ऐकली जातात. मराठी, हिंदी तसेच इतर अनेक भाषांत त्यांना गायन केले. यापैकी मराठी भाषेतील त्यांनी गायलेली ‘मलमली तारुण्य माझे’, ‘केव्हातरी पाहाटे’, ‘बुगडी माझी सांडली गं’, अशी काही गीतं रसिकांना प्रचंड आवडली. घरातच गायकी असल्यामुळे गाणं शिकण्याची संधी त्यांना घरातूनच मिळाली.