नवी दिल्ली/मुंबई : काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गुरुवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची (एमपीसीसी) पुनर्रचना केली. यात मोठ्या संख्येने उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि सचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाना पटोले यांनी फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर, आता या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. आगामी महापालिका आणि स्थानिक पातळीवरील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या या जम्बो कार्यकारिणीकडे पाहिले जात आहे.
काँग्रेसच्या या जम्बो कार्यकारिणीत सर्वच मोठ्या नेत्यांना खूश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आता प्रदेश काँग्रेसच्या या कार्यकारिणीत तब्बल १८ उपाध्यक्ष, ६५ सरचिटणीस, १०४ सचिव आणि ६ प्रवक्त्यांचा समावेश असणार आहे. या नव्या कार्यकारणीत काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांच्याकडे उपाध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे. त्यांच्यासह एकूण १८ उपाध्यक्ष असतील. याच बरोबर वैद्यकीय उच्च शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे भाऊ आणि आमदार धीरज देशमुख, माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांचे पुत्र शैलेश चाकूरकर आणि काँग्रेसचे फायरब्रँड प्रवक्ते सचिन सावंत यांच्याकडे सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
पृथ्वीराज चव्हाण डिसिप्लिनरी अॅक्शन कमिटीचे अध्यक्ष
या नव्या कार्यकारिणीत डिसिप्लिनरी अॅक्शन कमिटीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उल्हासदादा पवार, भालचंद्र मुणगेकर, मुझफ्फर हुसेन आणि हर्षवर्धन सपकाळ हे या समितीचे नवे सदस्य असतील.
सहा प्रवक्ते
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या या नव्या कार्यकारिणीत सहा प्रवक्त्यांचाही समावेश करण्यात आला आहे. यात, अनंत विठ्ठलराव गाडगीळ, अतुल लोंढे, राजू वाघमारे, सचिन सावंत, संजय लाखे पाटील आणि उत्कर्षा रुपवते यांचा समावेश असेल. याच बरोबर, ठाणे ग्रामीण, रायगड, भिवंडी शहर, उल्हासनगर शहर, सोलापूर ग्रामीण, सांगली ग्रामीण, जळगाव शहर, पुणे शहर आदी १४ जिल्ह्यांच्या अध्यक्षांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.