राजकारण

सचिन वाझेंचा आणखी एक ‘कार’नामा; एटीएसकडून आणखी एक कार दमणमधून जप्त

मुंबई: सचिन वाझेंच्या बाबतीत रोजच धक्कादायक खुलासे होत आहेत. आता एटीएसला दमन येथे सापडलेली ही कार सचिन वाझेंच्या पार्टनरची असल्याचं सूत्रांनी सांगितलं. एटीएसने दमन येथील एका फॅक्ट्रीत सोमवारी छापा मारला होता. तिथे त्यांना ही कार सापडली. दमनमध्ये सापडलेल्या या कारचा खरा मालक आणि वाझेच्या दरम्यानच्या कनेक्शनचाही एटीएस शोध घेत आहे. तर दुसरीकडे मनसुख हिरेन प्रकरणात अटक करण्यात आलेला विनायक शिंदे हा अँटालिया स्फोटक प्रकरणातील एक आरोपी असल्याचं तपास यंत्रणेने स्पष्ट केलं आहे.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एटीएसला अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. एटीएसने सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंची आणखी एक कार जप्त केली आहे. एटीएसने थेट दमनमधून वाझेची वॉल्व्हो कार जप्त केली आहे. एक्सपर्टकडून या कारची तपासणी करण्यात येत असून त्यातून महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एनआयएने विनायक शिंदेच्या फ्लॅटमधून एक प्रिंटर जप्त केला आहे. धमकावणारे पत्रं लिहिण्यासाठी याच प्रिंटरचा वापर करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. अँटालिया येथील स्फोटकांच्या कारमध्ये सापडलेलं पत्रं याच प्रिंटरद्वारे प्रिंट करण्यात आल्याचा एनआयएला संशय आहे. एनआयएने हा प्रिंटर जप्त करून चौकशीसाठी पाठवला आहे. तसेच सचिन वाझेच्या कार्यालयातून एक महत्त्वाची डायरीही एनआयएच्या हाती लागली असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाझे बनावट आधारकार्ड दाखवून पंचतारांकीत हॉटेलात राहत होते. वाझेंकडून बनावट आधारकार्डही जप्त करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वाझे 16 फेब्रुवारी रोजी हॉटेलात थांबले होते. त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज एनआयएने जप्त केले आहेत. बनावट आधारकार्ड दाखवून हॉटेलात राहण्याचे कारण काय? याचा पोलीस शोध घेत आहेत.

वाझेंच्या ऑफिसची झाडाझडती घेताना एनआयएच्या हाती सचिन वाझेंची डायरी लागली होती. कोणत्या दिवशी कोणाला भेटायचंय, याचीही तारीख डायरीत नमूद करण्यात आली आहे. पब्ज, बार, बुकी आणि इतर महत्त्वाच्या कारवायांचा उल्लेख आहे. या डायरीतून हफ्त्याची गुपितं उघडकीस येण्याची शक्यता आहे. कुणाला किती पैसे जात होते, याचा हिशेब सचिन वाझे ठेवत होते. डायरीत मुंबईतील सर्व बार, पब आणि हुक्का पार्लरची यादी आहे. ज्यांनी पैसे दिले त्याबाबत कोड भाषेत नोंद आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button