गोपीनाथ मुंडे असते, तर महाराष्ट्रातील सत्ता गेली नसती : महादेव जानकर
परळी : गोपीनाथ मुंडे हे सामान्य माणसाला घडवणारे महानायक होते. मी पंकजा मुंडे यांच्या सुखाऐवजी दुःखात जास्त सहभागी आहे. बापाचं छत्र गेल्यानंतर मुलगा अनाथ होतो, तसा मी झालो. मुंडे आज असते, तर सत्तेत विभाजन झालं नसतं. मुंडे बापमाणूस होते, गोपीनाथराव नाहीत म्हणून सत्ता गेली. मात्र राष्ट्रीय समाज पक्ष एनडीएसोबत आहे, अशा शब्दात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहिली.
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गडावरुन ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रासप नेते महादेव जानकर यांनी बीडमधील परळी येथे गोपीनाथ गडावर हजेरी लावली. बापाचं छत्र गेल्यानंतर मुलगा अनाथ होतो, तसा मी झालो, अशा भावना जानकरांनी यावेळी व्यक्त केल्या.
गोपीनाथ मुंडे आज असते तर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळी परिस्थिती पाहायला मिळाली असती. गोपीनाथ मुंडेंच्या जाण्यानंतर मी पंकजा मुंडेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. येत्या काळात ओबीसींचं नेतृत्व हे पंकजा मुंडेंनी करावं आणि पंकजा ते करत आहेत. ओबीसींच्या कोट्यातून इतर कोणालाही आरक्षण देता कामा नये. गोपीनाथ रावांच्या जाण्यानं मोठं नुकसान झालं, त्याची जाणीव ही पदोपदी येते, अशा भावना जानकरांनी व्यक्त केल्या.
राज्यात ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. ओबीसींनी या राज्याची सत्ता हाती घ्यावी, सत्तेत ओबीसी असल्याशिवाय ओबीसींचे प्रश्न सुटणार नाहीत. ओबीसींनो, सत्तेत या ही आमची भूमिका आहे, सगळ्या जातींना आरक्षण मिळावं ही आमची भूमिका आहे, मात्र ओबीसींच्या आरक्षणाला हात लागता कामा नये, अशी भूमिका जानकरांनी मांडली.