राजकारण

भाजपने कोंडी केली असताना महाविकास आघाडीत बिघाडी; शिवसेना-काँग्रेस आमने-सामने

लक्षात ठेवा, ठाकरे सरकार काँग्रेसच्या टेकूवर उभे आहे; नाना पटोलेंचा संजय राऊतांना इशारा

मुंबई : संजय राऊत हे काँग्रेसच्या नेत्यांवर टीका करत असतील तर आम्हालाही विचार करावा लागेल. राज्यातील महाविकासआघाडी सरकार हे काँग्रेसच्या टेकूवर उभे आहे, ही बाब शिवसेनेने लक्षात ठेवावी, असा रोखठोक इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला. तसेच यूपीएच्या अध्यक्षपदासाठी संजय राऊत यांच्याकडून सुरु असलेली शरद पवारांची वकिली त्यांनी थांबवावी, असेही नाना पटोले यांनी सांगितले.

ते शनिवारी भिवंडीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी UPA चे अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे द्यावे, अशी मागणी करणाऱ्या संजय राऊत यांना चांगलेच फैलावर घेतले. संजय राऊत यांची वक्तव्य पाहता ते शिवसेनेचे की राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, असा प्रश्न पडला आहे. दिल्लीत यूपीए 2 स्थापन करण्याच्या हालचाली व त्यासाठी संजय राऊत यांनी शरद पवारांकडे यूपीएचे नेतृत्व सोपवावे, ही केलेली मागणी हास्यास्पद आहे. शरद पवार हे राष्ट्रवादी पक्षात आहेत की शिवसेनेत हे तपासावे लागेल . तर संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत. ‘सामना’चे संपादक आहेत हे माहिती आहे. परंतु ते शरद पवारांचे प्रवक्ते झाल्यासारखे बोलत आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली 10 वर्षे मनमोहन सिंग यांचे केंद्रात सरकार होते. त्यात शरद पवार मंत्री होते हे विसरता कामा नये. काँग्रेस नेत्यांवर केली जाणारी टीका पक्षाकडून सहन केली जाणार नाही. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या लक्षात ही बाब आणून देणार आहोत. काँग्रेसमुळे सरकार आहे, आम्ही म्हणजे सरकार नाही, हे लक्षात आणून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे यूपीएमध्ये नसणाऱ्यांनी ही फुकटची वकिली करू नये, असा टोलाही नाना पटोले यांनी संजय राऊत यांना लगावला.

राज्यांमध्ये सध्या विविध कारणांमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच गेल्या आठवड्यात शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एक बॉम्बगोळा टाकला आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्षपद (UPA President) शरद पवार (Sharad Pawar) यांना देण्याची आवश्यकता आहे, असं मत त्यांनी पत्रकार परिषद व्यक्त केलं होतं. राऊतांचं हे विधान काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांना झोंबलं आहे. सोनिया गांधी (Sonia Gandhi) या सध्या संयुक्त पुरोगामी आघाडी अध्यक्ष असून त्यांना बदलवण्याचा कुठलाही विचार नाही. त्यामुळे युपीएचे अध्यक्ष बदलण्याबाबत जे बोलत आहेत, त्यांनी प्रथम युपीएचा घटक पक्ष म्हणून सामील व्हावं, असा सल्ला काँग्रेस नेते राजीव सातव (Rajiv Satav) यांनी दिला आहे.

यावरून आता काँग्रेस आणि शिवसेना मध्ये युपीए अध्यक्षपदावरून कलगीतुरा रंगला आहे. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर परमबीर सिंह यांनी लेटर बॉम्ब टाकलं आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. दरम्यानच्या काळात भारतीय जनता पक्षासोबत लढण्यासाठी तिसरी आघाडी बनवण्याची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं. काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष विरहित इतर राजकीय पक्षांची एक तिसरी आघाडी बनवण्याची आवश्यकता आहे, असं मत स्वतः शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं.

याच मताची रि ओढत शिवसेना नेता संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या सारख्या राजकारणातील ज्येष्ठ नेत्याला संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्ष बनवण्याची आवश्यकता आहे, असं मत व्यक्त केलं आहे. काँग्रेसमधील अनेक नेते हे शरद पवार यांच्या नावाला पसंती देतात. आतापर्यंत सोनिया गांधी या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष होत्या. पण सध्या त्यांच्या प्रकृतीमुळे त्या युपीएसाठी फार वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे भाजपचा विजयी रथ रोखण्यासाठी शरद पवार सर्वात योग्य आहेत, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button