टोक्यो : भारताची युवा बॉक्सर लवलीना बोरगोहेन हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आज झालेल्या महिलांच्या बॉक्सिंगच्या ६९ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व लढतीत लवलीना हिने तैवानच्या निएन चिन चेन हिच्यावर एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. याबरोबरच लवलीना हिने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी दुसरे पदक निश्चित केले आहे. उपांत्य फेरीत प्रवेशाने लवलीनाचे कांस्यपदक निश्चित झाले असले तरी आता उपांत्य आणि अंतिम फेरीच्या लढतींमधून चांगली कामगिरी करत पदकाचा रंग बदलण्याची संधी तिच्याकडे असेल. तसेच ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगमध्ये भारतासाठी पदक जिंकणारी लवलिना ही दुसरी महिला आणि एकूण तिसरी बॉक्सर ठरली आहे.
ऑलिम्पिकमध्ये धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या लवलीना हिने तैवानच्या निएन चिन चेन हिच्याविरुद्ध झालेल्या लढतीत सुरुवातीपासूनच दमदार कामगिरी केली. लवलिना हिने पहिल्या फेरीमध्ये तैवानच्या निएन चिन चेनचे आव्हान ३-२ अशा फरकाने परतवून लावले. त्यानंतर दुसऱ्या फेरीवरही लवलिना हिचाच वरचष्मा दिसून आला. तिने ही फेरी ५-० अशी सहज जिंकत सामन्यावर आणि पदकावर कब्जा केला.
याआधी २०१२ मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये मेरी कोम हिने भारतासाठी कांस्यपदक जिंकले होते. मात्र यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये मेरी कोम हिला पदकाने हुलकावणी दिली. मात्र आता उपांत्य फेरीत विजय मिळवून मेरी कोम हिच्यापेक्षा चांगली कामगिरी करण्याची संधी लवलीना हिच्याकडे असेल.