राजकारण

स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता हरपला; महाराष्ट्रातील नेत्यांना शोक

सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी निधन झाले. गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता गमावला : शरद पवार

लोकाभिमुख राजकारणाची कास धरत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा निवडून येण्याची किमया गणपतरावांनी साधली. त्यांच्या निधनामुळे जनसामान्यांचे आणि कार्यकर्त्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता आज आपण गमावला आहे, अशा शब्दांत यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. याचबरोबर, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व उपेक्षितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आणि क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला गणपतरावांसारखा लोकप्रतिनिधी खरंच विरळा म्हणावा लागेल, असेही शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे.

साधे, सात्विक व्यक्तिमत्व हरपले : उद्धव ठाकरे

राजकारण-समाजकारणातील एक साधे, सात्विक व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून दिवंगत देशमुख यांची वाटचाल कदापिही विसरली जाणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजलीही अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, ज्येष्ठ नेते देशमुख यांनी सर्वाधिक काळ आणि सातत्याने सांगोला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राज्य विधिमंडळात केले. हे तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे वैशिष्ट्य होतेच, पण त्यापेक्षाही ज्या साध्या आणि उच्च विचारसरणीने त्यांनी त्यांचे जीवन व्यतीत केले ते मला महत्वाचे वाटते असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, आबासाहेबांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केला, जो की वर्षानुवर्षे एक मापदंड म्हणून राजकीय विश्वात कायम राहील. सर्वच पक्षांत त्यांच्या विचारसरणीचे चाहते होते. संसदीय कार्यप्रणालीवर त्यांचा नितांत विश्वास होता. त्यामळे विधिमंडळाच्या कामकाजातही त्यांचा सर्वपक्षीयांना मार्गदर्शक म्हणून आधार होता, धाक होता. कष्टकरी- शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणारा नेता म्हणून त्यांची तळागाळापर्यंत ओळख होती. यातूनच त्यांनी विधिमंडळात अनेक कल्याणकारी योजनांचा पाठपुरावा केला. अशा योजनांना त्यांनी नेहमीच पक्षीय भेदापलिकडे जाऊन पाठबळ दिले. ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले : फडणवीस

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाने सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले आहे. विधानसभेने एक अतिशय चांगला मार्गदर्शक गमावला आहे. माझे त्यांच्याशी अतिशय जवळचे संबंध होते. त्यामुळे त्यांचे जाणे ही माझी वैयक्तिक हानी आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सामान्य माणसासाठी लढाई केली. गरीब, शेतकरी, शेतमजुरांसाठी संघर्ष केला. दुष्काळी भागासाठी कायम संघर्ष केला. ज्यांची भाषणे ऐकून आम्हाला महाराष्ट्र समजला ते गणपतराव देशमुख होते.

इतकी वर्षे राज्य विधानसभेत काम करताना त्यांनी कधीही आपल्या विचारांशी प्रतारणा केली नाही. कधी कोणती तडजोड केली नाही. गणपतराव देशमुख यांच्या भाषणांचा एक वेगळा प्रभाव असायचा. संपूर्ण सभागृह त्यांचे भाषण तन्मयतेने ऐकायचे. ते भाषण म्हणजे एक शिकवण असायची. त्यांनी संघर्ष केलेल्या दुष्काळी भागात आम्ही पाणी पोहोचविले तेव्हा आम्हाला आशीर्वाद देताना त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही. त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले. दुसरे गणपतराव देशमुख आता होणे नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे आप्तस्वकीय आणि असंख्य चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.

राजकारणातील भीष्म पितामह हरपला : जयंत पाटील

गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची मोठी हानी झाली आहेच. शिवाय त्यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह आज हरपला, अशा शब्दांत आपल्या शोक भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.

गणपतराव देशमुख यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. तब्बल पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत घालवला. एकाच विचारधारेचा झेंडा खांद्यावर घेऊन त्यांनी तो निष्ठेने आयुष्यभर सांभाळला. विधिमंडळात आबासाहेब बोलायला उभे राहिले कि सगळे सभागृह शांत होऊन ऐकायचे याची आठवणही जयंत पाटील यांनी सांगितली. तसेच, गणपतराव देशमुख यांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

चारित्र्यसंपन्न पर्वाचा अंत : नाना पटोले

शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव ( आबा ) देशमुख हे राजकारणातील ॠषीतुल्य व्यक्तीमत्व होते. त्यांनी तत्वाशी कधीही तडजोड केली नाही. गणपतराव देशमुख यांच्या निधनाने राजकारणातील चारित्र्यसंपन्न पर्वाचा अंत झाला आहे, अशा शोकभावना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदार संघाचे त्यांनी ५५ वर्षे प्रतिनिधीत्व केले. सहकार चळवळीतून उभी केलेली सूत गिरणी उत्तम रितीने चालवून त्यांनी सर्वांसमोर एक आदर्श घालून दिला आहे. कृषी, सहकार, क्रीडा क्षेत्रासाठी त्यांनी भरीव योगदान दिले आहे. विधानसभेतील त्यांची भाषणे अभ्यासू व माहितीपूर्ण असायची. ते सभागृहात बोलायला उभे राहताच सभागृह शांतपणे त्यांचे भाषण ऐकायचे. राजकारणातील नव्या पिढीसाठी ते आदर्श होते. गणपतराव देशमुख आयुष्यभर एकाच विचारधारेशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्या निधनाने फक्त शेतकरी कामगार पक्षाचीच नाहीत महाराष्ट्राची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. गणपतराव देशमुख साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी देशमुख कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असे पटोले म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button