Top Newsराजकारण

दोन महिन्यांपासून माझ्यावर, नातवांवर पाळत; नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून मी काही प्रकरण उघड केली आहेत. तेव्हापासून माझ्यावर काही लोक पाळत ठेवत आहेत. माझ्यावरच नाही तर माझ्या नातवाच्या शाळेपर्यंत हे लोक पोहोचले आहेत. या हेरगिरी करणाऱ्यांची सर्व माहिती मिळाली आहे. त्यांच्याविरोधात मी लवकरच पोलिसात तक्रार दाखल करणार आहे, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या घराची रेकी करण्यात येत असल्याबाबतची माहिती दिली. काही पक्षाचे कार्यकर्ते काही, लोकं आमच्या घराच्या ऑफिसची माहिती काढत आहेत. घरातील मुलं, माझे नातू कोणत्या शाळेत शिकतात त्याचा शोध घेत आहेत. मागच्या आठवड्यात मी दुबईत असताना दोन लोकं कॅमेरा घेऊन माझ्या घराच्या बाहेर फोटो काढत होते. फोटो काढत असताना या लोकांना परिसरातील लोकांनी अडवलं. त्यामुळे हे लोक पळून गेले. पण त्यांना टिळक टर्मिनसला अडवलं गेलं. पकडले जाऊ म्हणून घाबरून पळाल्याचं या लोकांनी सांगितलं, असं मलिक म्हणाले.

काल मी ट्विटर आणि फेसबुकवर या लोकांचे फोटो टाकले. त्यातील एका व्यक्तीची माहिती मिळाली आहे. दोन महिने जे काही चालत होतं, त्यावेळी ही व्यक्ती माझ्याविरोधात सातत्याने ट्विट करत होता. गाडीमालकाचंही नाव समोर आलं आहे. मी जे काही बोलत आहे, त्यावरून त्याचा काही लोकांशी संबंध असल्याचं दिसतंय. या प्रकरणी मी पोलिसांमध्ये तक्रार करणार आहे. तसेच पोलीस आयुक्तांना भेटून त्याची माहिती देणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

हवी असेल तर सर्व माहिती देईन

आम्ही एखाद्या ठिकाणी काही कागदपत्रं घ्यायला जातो किंवा तक्रार करायला जातो. तिथं तिथं हा व्यक्ती हजर असल्याचं आमच्या कार्यकर्त्यांनी माझ्या निदर्शनास आणून दिलं आहे. हे खूप गंभीर आहे. माझी माहिती हवी असेल तर मी सर्व माहिती देईन. पण ही हेरगिरी कशासाठी? असा सवाल त्यांनी केला.

माझा अनिल देशमुख करण्याचा केंद्रीय यंत्रणांचा डाव

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना खोट्या केसेसमध्ये अडकवण्यात आले. माझ्याविरोधातही त्याच पद्धतीचं षडयंत्र सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणा खोटी माहिती देवून मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप करतानाच या प्रकरणाची मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे लवकरच तक्रार करणार आहे, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत थेट केंद्रीय तपास यंत्रणांवरच हल्ला चढवला. मात्र, नेमकी कोणती केंद्रीय तपास यंत्रणा त्यांच्याविरोधात षडयंत्र रचत आहे हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. अनिल देशमुखांशी जो खेळ खेळण्यात आला. तोच खेळ माझ्यासोबत खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याची माहिती मला मिळाली आहे. पुरावे आले आहेत. माझ्याविरोधात खोटी तक्रार करण्यात आली आहे. मी त्याचीही माहिती मुंबई पोलीस आयुक्तांना देणार आहे, असं मलिक म्हणाले.

चॅटचे पुरावे पोलिसांना देणार

खोटी तक्रार करून देशमुखांविरोधात कारवाई झाली. मलाही खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याबाबतचे माझ्या हातात पुरावे आले आहेत. केंद्रीय यंत्रणेचे अधिकारी माझ्याविरोधात मसुदा तयार करून व्हॉट्सअॅपवर पाठवत आहेत. काही लोकांना माझ्याविरोधातील मजुकराचा ईमेल करत आहे. या माहितीच्या आधारे खोटी तक्रार करत आहेत. मला अडकवण्याचा डाव केंद्रीय यंत्रणा करत आहे. ते सहन करणार नाही. त्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करणार असून केंद्रीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅटचे पुरावेही पोलिसांना देणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

मला फ्रेम करण्याचा डाव

या प्रकरणाची मी अमित शहांकडे तक्रार करणार आहे. शहा यांना पत्रं लिहून तक्रार करणार आहे. मला अडकवण्याचा डाव करणार असाल तर मी घाबरणार नाही. या संपूर्ण प्रकरणावर शहा काय कारवाई करतात हे पाहणार आहे. तसेच माझ्याविरोधात कुठे कुठे आणि किती तक्रारी करण्यात आल्या त्याची आरटीआयमधून माहिती घेणार आहे. राज्याच्या मंत्र्यांना फ्रेम करण्याचा हा मोठा डाव आहे. एक अनिल देशमुख झाले, आता मला फ्रेम करून दुसरे देशमुख करण्याचा डाव आहे, असा दावा त्यांनी केला.

कोणत्याही महामंडळाचं सरकारमध्ये विलीनीकरण शक्यच नाही

कोणत्याही महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण शक्यच नाही, असं सांगतानाच मलिक यांनी याबाबतची व्यावहारिक कारणंही दिली आहेत. कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला तर इतर महामंडळातील लाखो कर्मचाऱ्यांनाही तोच दर्जा द्यावा लागेल. त्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी सरकारला कर्ज काढावा लागेल. ते योग्य होणार नाही आणि व्यवहारिकही नाही, असं मलिक म्हणाले.

भाजपकडून एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल

सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना बोनस देण्याचा निर्णय घेतला. पण भाजपचे दोन आमदार एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत आहेत. काही आमदार एसटी डेपोत जाऊन कामगारांना भडकावत आहेत. भाजप संप भडकावण्याचा खेळ खेळत होती. आता कर्मचाऱ्यांना सर्व लक्षात येत आहे. त्यामुळे कर्मचारी कामावर येत आहेत, असं त्यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button