मुक्तपीठ

पत्र युद्ध

- मुकुंद परदेशी (संपर्क ७८७५० ७७७२८)

प्रति,

आदरणीय बाळासाहेबांचे पुत्र, माननीय उधोजीराजे यांसी,

आधीच खुलासा करतो की , ज्यांच्याबद्दल मनात आदर असतो,त्यांना आदरणीय म्हणतात आणि जो (अनेक लटपटी खटपटी करून, स्वाभिमान गहाण टाकून तात्पुरता का असेना पण,) एखाद्या मानाच्या पदावर बसलेला असतो, त्याला त्या पदाचा मान ठेवण्यासाठी ( नाविलाजाने) माननीय म्हनावे लागते. गेल्या शनवारी तुम्हाला माझ्या चिपी विमानतळाचं उद्घाटन करायला शिंदुर्गात यावं लागलं हा मी माझा विजय समजतो. एखाद्या मुख्यमंत्र्याला उद्घाटन करण्यासाठी स्वतःचा एकही प्रकल्प नसावा आणि त्याला विरोधकांनी पूर्ण केलेल्या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यासाठी वाजतगाजत यावंं लागावं म्हणजे जणू, ‘ बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना.’ प्रोटोकॉल प्रमाणे अध्यक्षाच्या भाषणानंतर कोणाला बोलता येत नाही , नाहीतर तुमच्या त्या गुळगुळीत आणि बुळबुळीत भाषणातून तुम्ही जी मळमळ बाहेर काढलीत तिचा मी तिथेच समाचार घेतला असता. तुम्ही जरी कार्यक्रमाची पत्रिका छापतांना प्रोटोकॉल पाळला नाही, तरी मी मात्र कार्यक्रमाचा प्रोटोकॉल पाळला. जबाबदारीच्या पदावर बसल्यावर जबाबदारीने वागावं लागतं.तुमच्याकडे माझ्या एकही प्रश्नाचं उत्तर नव्हतं म्हणून तुम्ही उगाच कळकळ, तळमळ, मळमळ अशी यमकं जुळवत बसलात. तुमच्या अशा मिळमिळीत यमकांपेक्षा आमचे रामदास आठवले छान यमक जुळवतात. सत्तेसाठी नाहीतरी तुम्ही रामदास आठवले झालाच आहात, आता त्यांच्याकडून शीघ्र कविता करायलाही शिकून घ्या.

त्यादिवशी पूर्ण स्टेजवर माझ्यासमोर तुमचीच माणसं नाचत होती. असू द्या. नवरदेवापुढे बँडवाले नाचणारच. शिंदुर्गाचा किल्ला कोणी बांधला हे तर चौथीतला मुलगाही सांगेल, तुमचं ज्ञान तेवढंच आहे का ? पद जरी आपल्याला नशिबाने मिळालं असलं तरी जरा आपल्या पदाला शोभेल असं बोलत चला. कोकणातल्या मातीत फक्त आंबे आणि बाभळीच उगवत नाहीत तर फणसंसुध्दा उगवतात. ती बाहेरून काटेरी असली तरी आतला गर गोड असतो त्यांचा. बाळासाहेबांना आवडायची कोकणातली फणसं . कुठे काय उगवतं ते माहीत नसेल तर चिरंजीवांना विचारून घेत चला. पर्यटन मंत्री आहेत ते. त्यांना माहीत असेल. तुम्हाला होणाऱ्या चुकीच्या ब्रिफिंगमुळे असं होतं. थोडे सावध असा.कोकणाच्या मातीत काय उगवतं ते तुम्ही सांगितलं , पण वांद्र्याच्या मातीत आंब्याच्या झाडाला कारली लागतात हे सांगण्यासाठी मला पत्रकार परिषदच घ्यावी लागणार आहे. विमानात रौतांनी दिलेला पेढा मी थोडासाच खाल्ला, कारण मला घातपाताची शंका आली होती. आनंदाच्या क्षणी भाषणात ते कसं सांगणार , म्हणून मग डायबिटीसचं कारण सांगितलं. आनंदाच्या क्षणावर विरजण नको पडायला म्हणून मी फार म्हणजे फार संयम बाळगला, पण तुम्ही करायची ती आदळआपट केलीच. काढायची ती मळमळ बाहेर काढलीच.

त्यादिवशी माझ्या दै. प्रारचा वर्धापनदिन होता, पण तुम्ही साध्या शुभेच्छाही दिल्या नाहीत. त्यासाठी मनाचा मोठेपणा असावा लागतो. पोहऱ्यात येण्यासाठी आधी आडात तर असायला हवं ना ? आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार ? अर्थात तुमच्या शुभेच्छा असतो की नसोत, माझी आणि दै. प्रारची प्रगती ही होणारच आहे.’सूक्ष्म, लघु, मध्यम तो सिर्फ झांकी है, असली पिक्चर तो अभी बाकी हैं ! समजे ?’

आपला हितचिंतक

ना. ता. कणकवलीकर

ता.क. – आमच्या शिंदुर्गाची भौगोलिक रचनाच अशी आहे की, आम्ही ठरवलं तर तिथून कोणीच बाहेर पडू शकत नाही. तुम्हाला जाऊ दिलं. बाळासाहेबांच्या उपकारांची परतफेड केली समजा. – ना.ता.क.

————–

प्रति,

मित्रवर्य कणकवलीकर,

तुमचे पत्र मिळाले. तुम्हाला एवढी मळमळ होतेय हे जर कार्यक्रमातच सांगितलं असतं तर खिशात गोळी होतीच, ती दिली असती. शिवाय माऊथ डीझॉलविंग होती. पाण्याचीही गरज भासली नसती. आता मित्रवर्य का लिहिलं तेही सांगतो. ‘इक दुष्मन पे प्यार आया है.’ वगैरे काही नाही बरं का. तसं अजिबात काही नाही. त्याचं काय आहे ना की, तुम्ही ज्यांना श्रेष्ठी म्हणतात ना ते आमचे अजूनही मित्र आहेत. त्यांनी आम्हाला आणि आम्ही त्यांना अजूनही हातच्याला म्हणून राखून ठेवलेलं आहे. उद्या जर समजा परत एकत्र आलोच तर तुम्हीसुद्धा मित्रच व्हाल ना ? स्वाभिमान गहाण टाकण्याची तुमची काय व्याख्या आहे, जरा सविस्तर कळवावे. मला मिळणारं ब्रिफिंग चुकीचं नसेल तर, तुम्ही तुमचा फक्त कागदावरच असलेला ‘स्वाभिमान’ विसर्जित करूनच पुढच्या यात्रेला निघाला होतात ; हे खरं असावं. यमक जुळवायला बुध्दी लागते. ती आमच्याकडे पिढ्यानपिढ्या आहे. त्यामुळे पदरी माणसं बाळगतांना आम्ही त्यांच्या बुध्दीचा कधी विचारच केला नाही, हे तुम्हाला सांगण्याची गरज नसावी असे वाटते.सिंधुदुर्गाचा किल्ला कोणी बांधला हे मला चांगलंच माहीत आहे , पण आपल्याला कितीही ज्ञान असलं तरी समोरच्याची बौद्धिक पातळी पाहूनच बोलावं लागतं ना ? आता तुम्हाला जाहीरपणेच ‘सूक्ष्म, लघु, मध्यम’चं लेबल लागल्यामुळे तसं बोलावं लागलं. असो.

आपला मित्र

उधोजीराजे

ता.क. – तुमच्या प्रहारचा वर्धापनदिन आधी कळविला असता तर पाच पंचवीस अंक विकत घेतले असते. निदान एका दिवसापूरता तरी खप वाढला असता. असो. – उधोजीराजे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button