मुक्तपीठ

एका कार्यकारी संपादकाचे मालकास पत्र

- मुकुंद परदेशी (संपर्क -78750 77728)

प्रति,

ठाकरेकुलोत्पन्न, ठाकरेकुलभूषण, उर्फ मधले धनी उर्फ संपादकपती, राजाधिराज उधोजीराजे यांचे चरण कमळी ( जळो मेली ती कमळी.) सेवके कार्यकारी संपादकाचा शिरसाष्टांग नमस्कार. पत्रास कारण की , आपल्या पिताश्रींनी आम्हाला शेंदूर फासून आपल्या वर्तमानपत्राचा कार्यकारी संपादक बनविलेपासून ( त्यांना ती सवयच होती. ते कोणालाही शेंदूर फासून काहीही बनवत असत. अगदी मुख्यमंत्रीसुद्धा !) आम्ही आपल्या घराण्याची आणि आपल्या वर्तमानपत्राची इमानेइतबारे सेवा करीत आहोत. (संदर्भ – बाळराजेंनी आतापर्यंत खाल्लेल्या कॅडबरीजपैकी निम्मेपेक्षा जास्त आम्हीच शेजारच्या वाण्याच्या दुकानातून उधारीने, जी अद्यापपर्यंत दिलेली नाही आणि त्यामुळे आम्हाला आमचा येण्याजाण्याचा रस्ता बदलावा लागला आहे,आणून दिल्या आहेत. आठवड्यातून किमान तीनचार दिवस तरी वहिनी आमच्या हातात पिशवी देऊन आम्हाला भाजीबाजारात पिटाळतात.आपल्या वर्तमानपत्रातून लिहिणाऱ्या लेखकांचे मानधन अद्याप आम्ही दिलेले नाही. कोणी जास्तच तगादा लावल्यास प्रसंगी लेखक बदलून टाकले, पण आपल्या खजिन्यास तोशीस लागू दिली नाही.) असो.

सबब आपल्या घराण्यात किंवा वर्तमानपत्रात काही कमी जास्त घडत असल्यास ते आपल्या कानी घालणे हे आम्ही आमचे कर्तव्यच समजतो. ( मधल्या काळात बाळराजेंना नाईट लाईफचा छंद जडत असल्याचे आम्ही आपल्या कानी घातले होते, पण आपण त्याकडे कानाडोळा केला. नंतर एका मानसशास्त्राच्या पुस्तकात, ‘ माणूस आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छांची पूर्तता आपल्या मुलांकडून करून घेत असतो.’ असे वाचल्यानंतर ; आपण केलेल्या ‘ कानाडोळा’चा अर्थ लक्षात आला. असो.) गेल्या सुमारे वर्षभरापासून करोनाने जशी अनेक माणसं संपवलीत तशीच अनेक वर्तमानपत्रही संपवलीत. काहींच्या आवृत्या बंद झाल्यात. काहींच्या पुरवण्या बंद झाल्यात.काहींना पानांच्या संख्येसोबतच कर्मचाऱ्यांच्या संख्येतही कपात करावी लागली. काहींनी तर चक्क गाशाच गुंडाळला. आपल्या वर्तमानपत्राने मात्र या काळातही चांगलाच जोर धरला होता. सत्ताधाऱ्यांशी सलगी दाखविण्यासाठी अनेकजण आपले वर्तमानपत्र विकत घेत आणि आपल्याला तो ‘कॉम्प्लिमेंटरी’ येत असल्याचे सांगत ! असो.

सध्या मात्र आपल्या वर्तमानपत्राचा खप अचानकपणे लक्षणीय प्रमाणात कमी होऊ लागला आहे. ही गोष्ट विरोधीपक्ष नेत्यांच्या लक्षात आल्यामुळे ते आता खोडसाळपणा करून दिवसभरात कमीतकमी पंधरा ते वीस रद्दीवाल्यांना आपल्या वर्तमानपत्राच्या कार्यालयात, ‘ रद्दी देनी है क्या ?’ असं विचारायला पाठवून देतात. ( त्यांना कोणत्यातरी पेपर विकणाऱ्या पोऱ्याने आपला पेपर निम्मे किमतीत दिल्यामुळे ही बाब त्यांच्या लक्षात आली !) याबाबत थोडा खोलवर तपास केला असता खप कमी होण्याची कारणे खालील प्रमाणे आढळून आली आहेत.

१) आपल्या (?) गृहमंत्र्यांना अचानकच जावे लागल्यामुळे, तसेच ‘कलेक्टर’ची हुशारी अंगी असणारे ; पण कमी शिक्षणामुळे नाईलाजाने सहाय्यक फौजदार बनलेल्या मुंबई पोलीसदलभूषण साहेबांना सीबीआयने ‘उचलल्या’मुळे तमाम डान्सबार मालक, देशीबार मालक यासारख्या लोकांना आपला काही धाकच उरला नाही , सबब त्यांनी आपले वर्तमानपत्र घेणेच बंद करून टाकले.

२) आपल्या एका मित्रपक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या नावातच ‘ना’ हा नकारार्थी शब्द दोनदा असल्यामुळे ते ,पूर्वीच्या प्रदेशाध्यक्षांच्या तुलनेने जरा जास्तच ‘ निगेटिव्ह’ आहेत. त्यांनी आपले वर्तमानपत्र वाचणे बंद केले असून त्यांच्या कार्यकर्त्यांनीही ते बंद केले आहे. ( अर्थात त्याने फार काही फरक पडला असेल असे वाटत नाही. त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त अंक मी घरी खिडक्यांच्या काचा पुसण्यासाठी नेत असतो.) तरी खबरदारी म्हणून मी, ‘तुमच्या दिल्लीतल्या ‘मातोश्री’ आमचा पेपर वाचतात आणि त्याची दखल घेतात.’ अशी लोणकढी थाप मारून दिली आहे !

३) आपले लांगुलचालन करण्यासाठी मराठी वृत्तवाहिन्या सकाळच्या बातमीपत्रात आपल्या वर्तमानपत्रातील अग्रलेखाची चर्चा करतात , सबब तो किती फालतू आहे हे लोकांना न वाचताच कळते आणि लोक आपले वर्तमानपत्र घेण्याचे टाळतात.

४) लॉकडावूनच्या काळात रस्त्यावरच्या भेळ – पकोडीच्या गाड्या बंद असल्याने तेथे होणारा वापरही पूर्णपणे थांबला आहे.
या सर्व मुद्द्यांचा आपण तातडीने विचार करावा आणि यातून मार्ग काढावा. याबाबतीत हळूहळू हळूहळू काहीही करू नये. याचा दोष केंद्राला देऊन किंवा राज्यपालांना भेटूनही काही उपयोग होणार नाही. आपल्याला कळविणे माझे कर्तव्य होते ते मी पार पाडले आहे.

मे.जा. हो.

आपला कृपाभिलाषी
कार्यकारी संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button