राजस्थानमधील काँग्रेसच्या तीन मंत्र्यांचे राजीनामा देण्यासाठी सोनियांना पत्र
जयपूर : राजस्थानच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री गहलोत सरकारमधील तीन मंत्र्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मंत्रिपदावरुन पायऊतार होऊन पक्ष संघटनेसाठी काम करण्याची इच्छा गहलोत सरकारमधील तीन मंत्र्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सरकारमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा प्रकर्षानं दिसून येत आहे.
राजस्थान सरकारमधील रघू शर्मा, हरीश चौधरी आणि गोविंद सिंह डोटासरा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसच्या पक्ष बांधणीसाठी पूर्णवेळ काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती राजस्थान काँग्रेसचे प्रभारी अजय माकन यांनी दिली आहे. यासाठी तिन्ही मंत्र्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे.
दिवाळीआधीच राजस्थान सरकारमधील मंत्रिमंडळात बदलाचे वारे वाहू लागले होते. पण आता पूर्णपणे बदल करण्याची तयारी काँग्रेसनं सुरू केली आहे आणि याच दृष्टीकोनातून हे पहिलं पाऊल टाकलं जात असल्याचं सांगितलं जात आहे. मंत्रिमंडळातील फेरबदलच्या चर्चेनं जोर धरला असतानाच आज अजय माकन जयपूरमध्ये पोहोचले असून काँग्रेस नेतृत्त्व राजस्थानमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे.
राजस्थान काँग्रेसमध्ये सचिन पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या गटातील तणावाच्या बातम्या याआधीही समोर येत राहिल्या आहेत. राजस्थान काँग्रेसमधील संतुलन आणि संघटना मजबूत राखण्यासाठी काही संघटनात्मक बदल देखील होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
राजस्थान मंत्रिमंडळ विस्ताराचे काउंटडाउन
राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालच्या मंत्रिमंडळाच्या फेररचनेचं काउंटडाउन सुरू झालं आहे. येत्या एक-दोन दिवसांत मंत्रिमंडळ फेररचना पूर्ण केली जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. २१ किंवा २२ नोव्हेंबर रोजी मंत्रिमंडळ फेररचना होणार असल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, आज सायंकाळी ५ वाजता मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या मंत्रिमंडळ बैठकीत डॉ. रघू शर्मा, हरीश चौधरी, गोविंदसिंह डोटासरा आदींसह अनेक मंत्र्यांचे राजीनामे या बैठकीत घेतले जातील, असं सांगितलं जात आहे.
राजस्थान काँग्रेसचे प्रदेश प्रभारी अजय माकन यांचा जयपूर दौरा आणि त्यांच्या काही वक्तव्यांमधून या चर्चेला अधिकच चालना मिळाली आहे. माकन यांनी सांगितलं आहे, की मंत्री गोविंदसिंह डोटासरा, हरीश चौधरी आणि डॉ. रघू शर्मा यांनी काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहून राजीनामा सादर केला असून, पक्षसंघटनेसाठी काम करण्याची इच्छा पुन्हा व्यक्त केली आहे. याचाच अर्थ असा, की मंत्रिमंडळात तीन जागा रिक्त होणार आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात जास्तीत जास्त ३० मंत्री असू शकतात. सध्या मुख्यमंत्र्यांसह २१ मंत्री राजस्थानच्या मंत्रिमंडळात आहेत. म्हणजे मंत्रिमंडळात आधीच ९ जागा रिक्त असून, त्यात तीन मंत्र्यांनी राजीनामे दिले, तर ती संख्या वाढून १२ होईल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फारसं काम न केलेल्या मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवून मंत्रिमंडळ फेररचनेत नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ फेररचनेत निम्मे चेहरे नवे असतील. त्यामुळे कोणाला मंत्रिमंडळातून काढलं जाणार आणि नवे चेहरे कोणते असणार, याबद्दल कयास बांधले जाऊ लागले आहेत. असं मानलं जात आहे, की नव्या चेहऱ्यांमध्ये सचिन पायलट गटातल्या आमदारांची संख्या जास्त असेल.