राजकारण

वानखेडेंची नोकरी जाते, की मलिक यांचे मंत्रिपद जाते ते पाहुया : आठवले

कराड : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची एक वर्षात नोकरी घालवणार असं विधान राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलं होतं. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. वानखेडेंची नोकरी जाते की नवाब मलिक यांचं मंत्रिपद जातं हे पाहुया, असा खोचक टोला रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे.

आठवले आज कराड दौऱ्यावर होते. यावेळी आठवले यांनी हे विधान केलं. वानखेडेंची नोकरी जातेय की मलिक यांचे मंत्रीपद जातंय ते पाहुया, असं आठवले यावेळी म्हणाले. आर्यन खान प्रकरणात पक्षपातीपणा केला जातोय असं म्हणता येणार नाही. आरोप होतायंत मात्र पूर्ण चौकशी केल्यानंतर आर्यन खानसह इतरांना ताब्यात घेण्यात आले आहे. न्यायालयाने आर्यन खानचा जामीन फेटाळला आहे. याचा अर्थ असा की त्याच्या विरोधात एनसीबीकडे सबळ पुरावा आहे. त्यामुळे आरोप करणे योग्य नाही. सुशांत सिंग प्रकरणानंतर फिल्म इंडट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा पुरवठा होतोय हे सिध्द झाले आहे. त्यामुळे पक्षपातीपणा केला जातोय असं म्हणणे योग्य ठरणार नाही. जी माहिती मिळतेय त्याप्रमाणे कारवाई केली जातेय, असंही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी मनसे-भाजप युतीवरही भाष्य केलं. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने मनसेशी युती केली तर सत्ता येणार नाही. आमच्याशी युती केली तर त्यांचा महापौर आणि आमचा उपमहापौर होऊ शकतो, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आठवले यांनी काही दिवसांपूर्वीच एक प्रभाग तीन सदस्य ही निवडणूक पद्धतीला विरोध केला होता. ही पद्धत लोकशाहीला हरताळ फासणारी असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक वॉर्ड एक सदस्य हीच निवडणूक पद्धत असावी असं त्यांनी सांगितलं. ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षण असलेच पाहिजे त्याशिवाय निवडणुका होता कामा नयेत, राज्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी ५० हजारांची मदत करावी, दलित अत्याचार रोखवेत, त्यासाठी अ‍ॅट्रोसिटी कायद्यातील तरतुदींची अंमलबाजवणी करावी, अत्याचार पीडित महिलांना ५० लाखांची आर्थिक सांत्वनपर मदत करावी यासह विविध मागण्यांसाठी रिपाइंने आंदोलनही केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button