Top Newsराजकारण

आणखी एखादा कार्यक्रम करेक्ट करू; संजय राऊतांचा राणेंना खणखणीत इशारा

कुंडल्या आमच्याकडेही आहेत; ही तर येड्यांची जत्रा !

नाशिक : राज्यात भाजपच्या नवनिर्वाचित मंत्र्यांच्या यात्रा निघाल्या, पण त्यात एक अतिशहाणा निघाला. याची यात्रा नव्हे येड्यांची जत्रा सुरू आहे. त्यांनी मोदींचा आदेश पाळला नाही. अतिशहाणाल्याला कायद्याचा लगाम घालणं गरजेचं होतं आणि मुख्यमंत्र्यांनी तो लगाम घातला, असा जोरदार हल्ला संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान, अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करून दाखवू. आपल्याला कार्यक्रम करण्याची सवय आहे. कार्यक्रम केल्यावर परिणामाची चर्चा कधीही करत नाही, असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं आहे. दरम्यान, शिवसेना आणि नेत्यांची सगळी प्रकरणं मी हळूहळू बाहेर काढतो, असा उघड इशारा नारायण राणे यांनी दिला होता. त्यावर आम्ही सभ्यपणा पाळतोय, पण कुंडल्या आमच्याकडेही आहेत, आम्ही देखील संदूक उघडू शकतो हे लक्षात ठेवा, असं प्रत्युत्तर राऊतांनी दिलं आहे. राऊतांनी राणेंचे अक्षरश: वाभाडे काढले तसंच जे वादळ उठलंय ते अद्याप संपलेलं नाही, असं म्हणत राणेंना एकप्रकारे इशाराच दिला.

संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांबाबत राणेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नाशिकमध्ये शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन केलं होतं. त्याचाही उल्लेख करत राऊतांनी नाशिकच्या शिवसैनिकांचं कौतुक केलं. जिथं पोहोचायचा होता तिथं नाशिकचा आवाज पोहोचला आहे. अख्ख्या देशात गेल्या ८ दिवसांपासून फक्त नाशिकची चर्चा सुरू होती. तुम्ही एफआयआर दाखल केलात, तेव्हा मी भुवनेश्वरला होतो आणि तिथून परत आलो, असं संजय राऊत म्हणाले.

राज्यात भाजपच्या भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड यांनीही मोदींच्या आदेशानुसार जनआशीर्वाद यात्रा काढली. पण त्यांनी कुणीही शिवसेनेवर, उद्धव ठाकरेंवर किंवा महाविकास आघाडी सरकारवर टीका केली नाही. पण यात एकच अतिशहाणा निघाला. मुंबई विमानतळावर उतरल्यापासून त्यांनी खालच्या शब्दांत टीका सुरू केली होती. पण आपण नेहमी सभ्यता पाळत आलोय. बाळासाहेबांचे संस्कार आमच्यावर आहेत. उगाच कुणाला अंगावर आम्ही घेत नाही आणि कुणी अंगावर आलंच तर सोडणार नाही. यांची यात्रा ही यात्रा नव्हे, येड्यांची जत्रा होती, असं राऊत म्हणाले.

मोदींनी त्यांच्या नव्या मंत्र्यांना काय आदेश दिलेत ते मला जास्त माहित्येत. केंद्र सरकार करत असलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवा आणि सरकारच्या कामांचा प्रचार आणि प्रसार करा, लोकांचं म्हणणं ऐकून घ्या, असं मोदींनी सांगितलं आहे. पण एक अतिशहाणा मोदींचाही आदेश पाळत नाही. केंद्र सरकारचा प्रचार करण्याऐवजी शिवसेना, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि महाविकास आघाडीवर टीका करत सुटला आहे. ते जेव्हापासून मंत्री झालेत तेव्हापासून भाजप रोज १० फूट मागे जातोय आणि लवकरच भाजप फक्त अर्ध्याफूटावर येईल, असा टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला.

संशयकल्लोळ

उद्धव ठाकरे उत्कृष्ट मुख्यमंत्री ठरले. एक तरी भाजपाचा मुख्यमंत्री पहिल्या पाचात आहे का? असा सवाल करतानाच मी ठाकरे आहे. माझ्या डीएनएमध्ये राजकारण आहे हे त्यांनी दाखवून दिलं आहे. मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी यांच्यात काल बंद दारा आड चर्चा झाली. सगळ्यांना माहिती आहे काय चर्चा झाली, असं सांगून राऊत यांनी संशय निर्माण केलं आहे.

नारायण राणेंना आम्ही भाजपचा मानत नाही. भाजप जर त्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवणार असेल तर आमच्याकडे देखील अनेक खांदे आहेत. आम्ही तुम्हाला राजकीय खांदा द्यायला तयार आहोत, असा इशारा देतानाच राणेंचा आम्ही दोनदा पराभव केला. सत्तेत आल्यावर माणूस सज्जन होतो. त्यांनी हे भान ठेवायला हवं. तुम्ही भान सोडलं तर आम्हाला बेभान व्हावं लागेल. महाराष्ट्रावर यापुढे देखील सेनेची सत्ता राहील. आज सरकार तीन पक्षांचं आहे, उद्या काय सांगता येत एका पक्षाचं येऊ शकतं, असा दावा त्यांनी केला.

शिवसेनेसमोर उभा राहण्याची कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे. खुर्ची, पद म्हणजे सत्ता नाही. सत्ता आपल्या मनगटात असते. मी मुंबईत राहतो. पण मंत्रालयाकडे फिरकतही नाही. मी दिल्लीत गेलो की लोक बाजूला होतात. माझ्यातली छातीवर वार घेण्याची पॉवर ही खरी सत्ता आहे. सत्ता सदैव बाळासाहेबांची होती. चंदनाच्या चितेवर जाईपर्यंत बाळासाहेबांची सत्ता राहिली, असं त्यांनी सांगितलं.

संदुक उघडलं तर काय बाहेर पडेल लक्षात ठेवा

हे म्हणतात तुमच्या कुंडल्या काढू. तुम्हाला कुंडल्या नाहीत का? आम्ही तुमचे संदुक उघडलं तर काय बाहेर पडेल हे लक्षात ठेवा, असा इशारा देतानाच जठार छत्रपती संभाजी महाराजांची राणेंशी तुलना करतात. ज्यांनी राणेंच्या विरोधात आयुष्य घालवलं ते हे विधान करत आहेत. सेनेतून अनेक जण गेले, पण यांच्या सारखा उतमात कोणी केला नाही. पण उद्धवजींनी सांगितलं, वेडंवाकडं केलं तर सोडणार नाही.

नाशिकचं कौतुक

राणेंच्या विरोधात जिथून पहिली ठिणगी पडली त्या नाशिकचं कौतुक करताना संजय राऊत म्हणाले, गुन्हा दाखल करण्याचं हिमतीच काम नाशिकमध्येच होऊ शकत, हे मला माहिती होतं. ज्या हिमतीने तुम्ही ही लढाई लढता आहात, त्या साठीच मी नाशिकला आलोय. भविष्यात नाशिक हा महाराष्ट्राचा मार्गदर्शक आणि दिशादर्शक असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button