Top Newsफोकस

अफगाण सरकारची तालिबानसमोर शरणागती; राष्ट्रपती भवनात शांततेत सत्ता सोपविण्याची तयारी सुरू !

अशरफ घनी यांचा राजीनामा

काबूल – अफगाणिस्तानातून तालिबानी दहशतवाद्यांसदर्भात एक चिंताजनक बातमी आली आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये पाय ठेवला असल्याचे समजते. एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या तीन अधिकाऱ्यांनीही तालिबानी दहशतवादी काबुलच्या सीमेत घुसल्याची पुष्टी केली आहे. यापूर्वी तालिबानने सर्व बॉर्डर क्रॉसिंगवर ताबा मिळवला आहे.

आता तालिबानने ट्रांझिशन फेजची (सत्ता परिवर्तन) मागणी केली आहे. यावर अफगाणिस्तानचे कार्यवाहक गृहमंत्री अब्दुल सत्तार मिर्झाकवाल यांनीही मान्यता दिली आहे. टोलो न्यूजनुसार, अफगाणिस्तानचे कार्यवाहक गृहमंत्री अब्दुल सत्तार मिर्झाकवाल म्हणाले, काबूलवर हल्ला होणार नाही, सत्ता परिवर्तन शांततेत होईल. एवढेच नाही, तर काबुलच्या सुरक्षेची जबाबदारी सुरक्षा दलांची आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. तालिबानकडून वाटाघाटी करणारे काही लोक अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनात जात आहेत. ते तेथे सत्ता हस्तांतरणासंदर्भात चर्चा करतील.

तत्पूर्वी, तालिबानने निवेदन जारी केले होते, की काबुलवर ताकदीच्या जोरावर ताबा मिळविण्याची तालिबानची इच्छा नाही. आम्हाला सर्व काही ट्रांझिशन फेजने हवे आहे. तसेच, सत्ता परिवर्तन सहजतेने झाले, तर कुठल्याही प्रकारची जीवित वा वित्त हानी होणार नाही.

तालिबानी दहशतवादी काबूलमध्ये घुसल्याचे वृत्त येत असतानाच, तालिबाननेही एक निवेदन जारी केले आहे. यात, दहशतवाद्यांनी काबूलमध्ये प्रवेश करू नये आणि सीमेवर थांबावे, असे सांगण्यात आले आहे. एवढेच नाही, तर आपण नागरिक अथवा अफगाण सैन्यावर बदला घेण्याच्या भावनेतून कसल्याही प्रकारची कारवाई करणार नाही, असे आश्वासन देतो. याच बरोबर सर्वांना घरातच राहण्याचीही धमकी देण्यात आली आहे. तसेच कुणीही देश सोडण्याचाही प्रयत्न करू नये, असेही यात म्हणण्यात आले आहे.

अशरफ घनी यांचा राजीनामा

अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी अखेर तालिबान्यांसमोर शरणागती पत्करली आहे. अशरफ घनी यांनी अफगाणिस्तानच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तालिबान कमांडर मुल्ला अब्दुल गनी ब्रार दोहाहून काबुलला पोहोचल्याच्या बातम्या समोर येत आहेत. ते अफगाणिस्तानचे नवे राष्ट्रपती होऊ शकतात. अफगाणिस्तानच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की तालिबान सत्ता हस्तांतरणाच्या तयारीसाठी राष्ट्रपतींच्या निवासस्थानी जात आहेत. या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, या बैठकीचा उद्देश शांततापूर्ण पद्धतीने तालिबानला सत्ता सोपवणे आहे. तालिबानने सांगितले की, बळजबरीने सत्ता हस्तगत करण्याचा त्यांचा हेतू नाही.

मलाला युसूफझाईला चिंता

अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर पाकिस्तानची नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईचे वक्तव्य समोर आले आहे. ती म्हणाली की अफगाणिस्तानवर तालिबानच्या कब्जामुळे मोठा धक्का बसला आहे. महिला, अल्पसंख्यांक आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या स्थितीबद्दल खूप चिंता वाटतेय. मलालाने ट्विट केले की, अफगाणिस्तान तालिबान्यांनी ताब्यात घेतले आहे, हे पाहून आम्हा सर्वांना मोठा धक्का बसला आहे. मला तिथल्या महिला, अल्पसंख्यांक आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची खूप चिंता वाटतेय. जागतिक, प्रादेशिक आणि स्थानिक शक्तींनी त्वरित युद्धबंदी करुन मानवतावादी मदत प्रदान करणे, निर्वासित आणि नागरिकांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button