मुंबई : शिवसेनेचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केलेल्या विधानामुळे राज्यात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेचं सरकार ही फक्त सत्तेसाठी केलेली तडजोड आहे. शिवसेना कधीही काँग्रेसी विचाराची होऊ शकत नाही असं त्यांनी म्हटल्याने महाविकास आघाडीत सगळं काही आलबेल आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. मुनगंटीवार म्हणाले की, संजय राऊत यांचा अपवाद सोडला तर शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याची नार्को टेस्ट करा त्यातून एकच सत्य बाहेर पडेल ते म्हणजे शिवसेनेनं राष्ट्रवादी-काँग्रेससोबत जाणं हे राजकीय आत्महत्या आहे. संजय राऊत शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे हा पीचएडीचा विषय आहे. ते नेहमी उद्धव ठाकरेंचे कौतुक कमी शरद पवार यांचेच कौतुक जास्त करताना दिसून येतात असं त्यांनी सांगितले.
भाजप नेते किरिट सोमय्या यांना पाठवलेल्या नोटिशीवरुन गृहमंत्रालयाने ही कारवाई केल्याचं शिवसेनेचे संजय राऊत म्हणाले होते. मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना या कारवाईची कल्पना नव्हती का? शिवसेना-राष्ट्रवादीत विसंवाद आहे का? असं विचारलं जाऊ लागलं. त्यानंतर अनंत गीते यांनी केलेल्या विधानामुळे महाविकास आघाडीतील गटबाजी पुन्हा एकदा दिसून आली.