Top Newsमनोरंजनराजकारण

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई : लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्यासोबत अनेक कलाकारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईच्या राष्ट्रवादी कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. गेल्या काही काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या कलाकारांचा ओघ वाढतच चालला आहे. सुरेखा पुणेकर यांच्यासह गायिका देवयानी बेंद्रे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये‌ जसे सर्व जातीधर्मातील लोक आहेत त्याप्रमाणेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा देखील सहभाग असला पाहीजे, ही शरद पवार यांची भूमिका आहे. आज प्रवेश केलेल्या सर्व मान्यवरांचे मी पक्षात स्वागत करतो, असे अजित पवार यांनी यावेळी म्हटले. तसेच, जे नवीन सदस्य पक्षप्रवेश करत आहेत, त्यांच्यासोबत सुसंवाद ठेवून त्यांना पक्षाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सामावून घ्यावे, अशी सूचनाही अजित पवार यांनी चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे मुंबई अध्यक्ष मनोज व्यवहारे व युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांना केली.

सुरेखा पुणेकर राजकीय मैदानात उतरणार असल्याचं नेहमी बोललं जायचं. मागील वेळी पुणेकर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचं बोललं होतं. तेव्हापासून सुरेखा पुणेकर राजकीय पक्षात प्रवेश करणार हे निश्चित होतं. राज्यपालांकडे पाठवलेल्या नावांपैकी एका नावावर आक्षेप असल्यास सुरेखा पुणेकर यांना संधी मिळू शकते अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आतापर्यंत कलेची सेवा केली आणि जनसेवा करण्यासाठी राजकारणात यायचंय. महिलांचे प्रश्न सोडवायचे आहेत असं सुरेखा पुणेकर म्हणाल्या. लोकगायक आनंद शिंदे यांचं नावही राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी एका जागी पाठवण्यात आलं आहे. साहित्य आणि कला क्षेत्रातून आनंद शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदारकी मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button