राजकारण

पोलीस निरीक्षक सुनील माने बडतर्फ

मुंबई: एनआयएच्या अटकेत असलेला पोलीस निरीक्षक सुनील माने याला अखेर मुंबई पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. ॲंटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरन हत्याकांडात बडतर्फ झालेले माने हा चौथा पोलीस अधिकारी असून या आधी सचिन वाझे, रियाझुद्दीन काझी, विनायक शिंदे यांना बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३११ (२) (बी) अंतर्गत मिळालेल्या विशेषाधिकाराचा वापर करून माने याला बडतर्फ केले आहे.

ॲंटिलिया स्फोटक प्रकरण उघडकीस आले त्यावेळी सुनिल माने हा गुन्हे शाखा युनिट ८ मध्ये कार्यरत होता. या प्रकरणात त्याने वाझेला मदत केल्याचे समोर येताच त्यांची सशस्त्र विभागात बदली करण्यात आली होती. काही दिवसांनी त्याचा गुन्ह्यात सहभाग स्पष्ट झाल्यानंतर एनआयएने त्याला अटक केली. याप्रकणात अटक झालेल्या सर्व चारही पोलिसांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

सुनील माने हा मुंबईतील कांदिवली क्राइम ब्रँचचा पोलीस निरीक्षक होता. माने याची दहशतवाद पथकाच्या काळाचौकी युनिटमध्ये चौकशी करण्यात आली. सुनील माने याला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणाची पूर्वकल्पना होती असा राष्ट्रीय तपास यंत्रणेचा दावा होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button