राजकारण

राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी शिवसेनेची ताकद कमी होणार नाही : विनायक राऊत

मुंबई-गोवा महामार्ग भाजपच्या ठेकेदारांमुळे रखडला

रत्नागिरी : भाजप नेत्यांच्या जन आशीर्वाद यात्रेमुळे महाविकास आघाडी सरकारला टक्कर वगैरे काही मिळणार नाही. यात्रा निघाली, नाही निघाली तरी महाविकास आघाडी सरकार कायम रहाणार आहे, असा दावा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. नारायण राणेंचा केंद्रीय मंत्री झाल्यानंतर पहिला दौरा होतोय. त्यावरून सुद्धा खासदार राऊत यांनी राणेंना लक्ष्य केलंय. नारायण राणेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यापूर्वी वाभाडे काढले होते. अडगळीत टाकलेल्या मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे कोकणातल्या सेनेची ताकद कमी होणार नाही, नाराय़ण राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही, असा हल्लाही त्यांनी चढवला. राणेंना शिवसेनेनेच दोन वेळा पराभव दाखवून दिलाय. राणे म्हणजे पनवती, त्यांना भाजपने अनेक ठिकाणी फिरवावंच. त्यामुळे भाजपचीच ताकदच कमी होईल, असा चिमटाही त्यांनी काढला.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना विनायक राऊत यांनी जन आशीर्वाद यात्रेवरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. जन आशीर्वाद हा शब्द शिवसेनेचाच आहे. भाजपने तो चोरला आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले म्हणून भाजपने जन आशीर्वाद यात्रा काढली होती. आता चार मंत्र्यांना घेऊन या यात्रेच्या माध्यमातून भाजप त्यांचा राज्यातील ग्राफ वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यात त्यांना यश मिळणार नाही, असा टोला राऊत यांनी लगावला.

यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्रावरही भाष्य केलं. गडकरींबद्दल शिवसेनेला आदर आहे. गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चांगले संबध आहेत. असं असताना गडकरी यांनी मग मीडियामध्ये हे पत्र का लिक केलं? असा सवाल राऊत यांनी केलाय. गडकरींनी एकाच बाजू सांगितली. मुंबई-गोवा महामार्ग भाजपच्या ठेकेदारांमुळे रखडला, रत्नागिरीत अशी दहा उदाहरणे आपण देवू शकतो, असे थेट आव्हान ही त्यांनी दिलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button