मुंबई : ज्या आवाजानं गेल्या सहा दशकाहून अधिक काळ समस्त भूतलावरील श्रोत्यांना अमृतवाणीची अनुभूती दिली अशा दैवी चेहऱ्याचं अंतिम दर्शन घेण्यासाठी प्रभूकुंज ते शिवाजी पार्क रस्त्याच्या दुतर्फा चाहत्यांची गर्दी… अलोट जनसागर…कला, क्रिडा अन् राजकीय क्षेत्रासह अनेक दिग्गजांची उपस्थिती… अन् साश्रूपूर्ण नयनांनी ‘लता मंगेशकर अमर रहे’च्या घोषणा, अशा वातावरणात भारतरत्न लता मंगेशकर यांना अंतिम निरोप देण्यात आला. संध्याकाळी ७ वाजून १६ मिनिटांनी लतादीदींच्या पार्थिवावर शासकीय इमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आणि देशाचा अमृत आवाज अनंतात विलीन झाला. पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांनी लतादीदींच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. मंगेशकर कुटुंबीयांसह उपस्थित जनसमुदायासह संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. लता दीदींनी आज इहलोकातून देहरुपी निरोप घेतला असला तरी त्या दैवी स्वरांतून नेहमीच सर्वांच्या मनात कायम राहतील.
लतादीदींच्या जाण्याने देशाचा सूर हरपला आहे. सारा देश हळहळ व्यक्त करत आहे. लतादिदींवर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देशाचे पंतप्रधान मोदी उपस्थिती लावत आदरांजली वाहिली. दीदींना निरोप देण्यासाठी अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे असे मोठे नेतेही उपस्थित होते. त्याचबोरबर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील सुभाष देसाई हे मंत्रीही अंत्यस्काराला आलेले दिसून आले. राज ठाकरेही परिवारासह उपस्थित होते. फक्त राज्यातील मंत्रीच नाही तर केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी हजेरी लावत आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूला देवेंद्र फडणवीस बसले होते मात्र मुख्यमंत्र्यांना बघताचं फडणवीस उठले आणि मुख्यमंत्र्यांना मोदींशेजारी जागा दिली. सारा देश सध्या दीदींच्या जाण्याने शोकसागरात बुडाला आहे.
फक्त नेतेमंडळीच नाही तर बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनीही आंदरांजली वाहण्यासाठी उपस्थिती लावली होती. यावेळी शाहरुख खान, जावेद अख्तर अशी अनेक मंडळी छत्रपती शिवाजी पार्कवर दाखल झाल्याचे दिसून आले. यावेळी भारतरत्न सचिन तेंडुलकरही यांनीही हजेरी लावत आदरांजली वाहिली.
लता मंगेशकर यांचं आज सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी दीर्घ आजाराने निधन झालं. त्या तब्बल २८ दिवस ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत होत्या. काल त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्या उपचाराला प्रतिसादही देत नव्हत्या. अखेर आज सकाळी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आज आपले नियोजित कार्यक्रम रद्द करुन मुंबईकडे प्रस्थान केलं आणि शिवाजी पार्कमध्ये पोहोचून लता मंगेशकर यांचं अंत्यदर्शन घेतलं. लतादीदींना २००१ साली संगीत क्षेत्रातील देदीप्यमान कामगिरीबद्दल ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. पद्मविभूषण, पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार यांसह असंख्य पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. १९९२ मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारनं लता मंगेशकर यांच्या नावाने लता मंगेशकर पुरस्कार नावानेही पुरस्काराचीही सुरुवात केली. तर मध्य प्रदेश सरकरानंही १९८४ सालापासून लता मंगेशकर पुरस्कार देण्याची परंपरा सुरू केली. जी अविरत सुरू आहे. लता दीदींच्या आयुष्याचा प्रवास जरी आज थांबला असला तरी दैवी सुरांमधून व सुमधुर आवाजातून भारतीयांच्या अंतकरणात दीदींनी लावलेला स्नेहदीप सदैव चैतन्यानं युक्त राहील.
उद्या राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर, शाळा, महाविद्यालयंही बंद राहणार
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यानुसार उद्या राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसह शाळा, महाविद्यालयं देखील बंद राहणार असल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे.
भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे, असं राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात नमूद केलं आहे.
दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे केंद्र सरकारकडून देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर देशातील सरकारी कार्यालयं, मंत्रालय, संसद भवनावरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात आला आहे.
लतादीदींनी हॉस्पिटलमध्ये ईयरफोन मागविले, वडिलांची गाणी ऐकली अन् प्राण सोडले !
अवघ्या जगाला गोड गळ्याने वेड लावणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर आज अनंतात विलिन झाल्य़ा. मुंबईत आज जनसागर लोटला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर, शाहरुख खानसह अनेक क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती शिवाजीपार्कवर आले होते. लतादीदी कधीच आपली गाणी ऐकत नसत, अखेरच्या क्षणीदेखील त्यांनी वडिलांनी गायलेली नाट्यगीते ऐकली आणि या जगाचा निरोप घेतला. लता मंगेशकर यांच्या जीवनावर पुस्तक लिहिणारे हरीश भिमानी यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी लता दीदींचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांच्या हवाल्याने ही माहिती दिली. अखेरच्या दोन दिवसांत लतादीदी काय करत होत्या याबद्दल हृदयनाथ यांनी त्यांना सांगितले. लता मंगेशकर दोन दिवसांपूर्वी शुद्धीत होत्या. व्हेंटिलेटरवर असताना त्यांनी ईअरफोन मागविले. त्यांना स्वत:ची गाणी ऐकणे आवडत नव्हते. त्यांनी या क्षणाला त्यांचे वडील पंडीत दीनानाथ मंगेशकर यांची नाट्यगीते ऐकली, असे हृदयनाथ मंगेशकर यांनी भिमानी यांना सांगितले.
कोट्यवधींची संपत्ती मागे ठेवून गेल्या लतादीदी
भारतरत्न गानसम्राजी लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. लता मंगेशकर यांनी त्यांच्या करिअरची सुरूवात १९४२ साली केली होती. त्यांना महल चित्रपटातील ‘आएगा आने वाला’ या गाण्यातून लोकप्रियता मिळाली होती. लता मंगेशकर यांनी जगभरातील ३६ भाषेतील ५० हजारांहून जास्त गाणी गायली आहेत. त्यांनी अनेक दिग्गज गायकांसोबत गाणी गायली आहेत. लता मंगेशकर यांना पहिल्या गाण्यासाठी फक्त २५ रुपये मानधन मिळाले होते.
साधे राहणीमान असणाऱ्या लता दीदींची संपत्ती कोटींच्या घरात आहे. एका अहवालानुसार, लता मंगेशकर यांची एकूण संपत्ती सुमारे ५ कोटी डॉलर्स इतकी आहे. म्हणजेच जवळपास ३६८ कोटी रुपये इतकी आहे. गाण्यांच्या रॉयल्टीतून आणि अन्य गुंतवणुकीतून त्यांनी ही संपत्ती कमावली आहे. तसेच लता मंगेशकर यांचे दक्षिण मुंबईतील पेडर रोड येथे प्रभु कुंज भवन नामक घर आहे. या घराची किंमत कोटींच्या घरात आहे. लता मंगेशकर या कारच्या शौकीन आहेत. त्यांच्याकडे शेवरलेट, ब्यूक आणि क्रायस्लर अशा अनेक शानदार फोर व्हिलर्स आहेत. इतकेच नाही तर ‘वीर झारा’ चित्रपटातील गाणं रिलीज झाल्यानंतर त्यांना चित्रपट निर्माते यश चोप्रा यांनी एक मर्सिडीज कार भेट म्हणून दिली होती.
पश्चिम बंगालमध्ये पुढील १५ दिवस लतादीदींची गाणी वाजणार
भारतरत्न लता मंगेशकर यांना अनोखी श्रद्धांजली देत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी घोषणा केली आहे. पश्चिम बंगालमध्ये सार्वजनिक ठिकाणी पुढील १५ दिवस लता मंगेशकर यांनी गायलेली गाणी वाजणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. लता दीदींनी संगीत क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना अनोखी मानवंदना देण्याच्या दृष्टीनं ममता बॅनर्जी यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
पश्चिम बंगालमधील सर्व सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच कार्यालयं, कार्यालयांच्या लिफ्ट, ट्राफिक सिग्नल अशा ठिकाणी लता मंगेशकर यांची गाणी लावली जाणार आहेत. तसंच पश्चिम बंगालमध्ये उद्याचा सर्व शासकीय कार्यालयांना ‘हाफ डे’ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय कार्यालयं उद्या अर्धा दिवसच कामकाज केलं जाणार आहे.