राजकारण

लालूप्रसाद यादव यांना अखेर जामीन

रांची : दुमका कोषागार घोटाळ्याप्रकरणी राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना अखेर जामीन मिळाला आहे. रांची उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे ४२ महिने, ११ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर अखेर लालू प्रसाद यादव तुरुंगाच्या बाहेर येणार आहेत. कागदपत्रांची सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर ते तुरुंगातून बाहेर येतील.लालू प्रसाद यांच्या जामिनाच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार होती. मात्र, कोर्ट बंद असल्याने सुनावणी होऊ शकली नाही. अखेर शनिवारी ही सुनावणी होताच कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला.

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर लालू प्रसाद तुरुंगाबाहेर येतील. कोरोनामुळे बेल बाँड भरण्याच्या प्रक्रियेला वेळ लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, लालू प्रसाद यांच्यावर दिल्लीच्या एम्समध्ये उपचार सुरू आहेत. आता कोणत्या रुग्णालयात उपचार करायचे हे त्यांच्यावर अवलंबून असणार आहे.लालू यांना जामीन मिळू नये, यासाठी सीबीआयने जोरदार विरोध केला. मात्र, सीबीआयच्या युक्तिवादानंतर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आक्रमकपणे लालूंची बाजू मांडली. सीबीआय जाणूनबुजून लालूंना तुरुंगातून बाहेर येण्यास मज्जाव करत आहे. त्यांची केस विनाकारण लटकवण्याचे काम सुरू आहे, असे सिब्बल यांनी कोर्टाला सांगितले.

चारा घोटाळ्याशी संबंधित असलेल्या दुमका कोषागार प्रकरणात सीबीआयच्या विशेष कोर्टाने लालू प्रसाद यादव यांना १४ वर्षांची शिक्षा ठोठावली होती. लालू प्रसाद २३ डिसेंबर २०१७ पासून तुरुंगात आहेत. कारण, त्यांना चारा घोटाळ्यात दोषी ठरवण्यात आलं आहे. इतकंच नाही तर लालूंवर बर्‍याच आजारामुळे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुमका कोषागार घोटाळा आणि भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्यांना ७-७ वर्षांची शिक्षा सुनावली होती. एक शिक्षा संपल्यानंतर दुसरी शिक्षा सुरू करण्याचे कोर्टाने आदेश दिले होते. आता लालूंना या प्रकरणात जामीन मिळाला आहे. लालूंनी दुमका घोटाळ्याप्रकरणी अर्ध्याहून अधिक शिक्षा भोगली आहे. त्यांना अनेक व्याधी आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृती पाहता, त्यांना जामीन दिला पाहिजे, अशी मागणी त्यांच्या वकिलाने याचिकेतून केली होती. त्याला सीबीआयने विरोध केला होता. एक शिक्षा संपल्यानंतर दुसरी शिक्षा सुरू होईल, असे कोर्टाने म्हटले असल्याचे सीबीआयने निदर्शनास आणून दिले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button