कृष्णा, वारणा नद्यांना पूर; सांगली जिल्ह्यातील २५ रस्ते पाण्याखाली
सांगली : राज्यात रायगड, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं हाहा:कार माजवला आहे. या तिन जिल्ह्यात दरड कोसळून ६० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे सांगली जिल्ह्यातही गेल्या दोन ते तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील या दोन प्रमुख नद्यांना पूर आल्यामुळे जिल्ह्यातील अनेक पूल आणि बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर या पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील २५ ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यात ८ राज्यमार्ग आणि १८ जिल्हा मार्गांचा समावेश आहे. यामध्ये शिराळा,पलूस, मिरज आणि वाळवा तालुक्यातील रस्त्यांचा समावेश आहे. त्या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व वाहतूक अन्य मार्गांवरुन वळवण्यात आली आहे.
कोल्हापूर आणि सांगलीमध्येही पूरस्थिती निर्माण झाली आहे. असं असलं तरी कोल्हापूर, सांगलीमध्ये यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिलीय. कृष्णा खोऱ्यात झालेल्या अतिरिक्त पावसामुळे पाणी सोडावं लागलं. त्यामुळे सांगली आणि परिसरात पुरस्तिथी निर्माण झाली आहे. मात्र, यंत्रणा सज्ज असल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं.