
शारजाह : कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी करताना दिल्ली कॅपिटल्सवर रोमहर्षक विजय मिळवला. आज सर्व पत्ते दिल्लीच्या विरोधात पडले. नाणेफेकीचा कौल, त्यानंतर मार्कस स्टॉयनिसला बढती देऊनही आलेले अपयश अन् गोलंदाजांची सुमार कामगिरी, त्यात भर म्हणून ढिसाळ क्षेत्ररक्षण… यामुळे दिल्लीला हार मानावी लागली. दिल्लीनं १८ व १९ षटकांत चार धावा देताना दोन महत्त्वाच्या विकेट्स घेत सामना अखेरच्या षटकापर्यंत खेचला. आर अश्विननं २०व्या षटकात सलग दोन धक्के देत दिल्लीच्या बाजूनं सामना फिरवला, परंतु राहुल त्रिपाठीच्या एका उत्तुंग फटक्यानं सर्व चित्र बदलले आणि कोलकाताचा ३ गडी राखून विजय झाला. कोलकातानं फायनलमध्ये एन्ट्री मारून चेन्नई सुपर किंग्ससमोर तगडे आव्हान उभं केलं आहे. २०१२मध्ये कोलकाता व चेन्नई असा फायनल सामना झाला होता आणि आता पुन्हा त्यांच्यात जेतेपदाची लढत होणार आहे.
श्रेयस अय्यर व रिषभ पंत याच्या आधी मार्कस स्टॉयनिसला फलंदाजीला पाठवण्याचा दिल्लीचा निर्णय फसला. स्टॉयनिस काही कमाल करू शकला नाहीच, पण धावा कमी होण्याच्या दडपणाखाली अय्यर, रिषभ, शिमरोन हेटमायर हेही अपयशी ठरले. सलामीवीर पृथ्वी शॉ याला १८ धावा करता आल्या. मार्कस स्टॉयनिस (१८), शिखर धवन (३६), रिषभ पंत (६), शिमरोन हेटमायर (१७) यांना मोठी खेळी करता आली नाही. हेटमायर जीवदान मिळूनही केवळ १४ धावा जोडून धावबाद झाला. अय्यर ३० धावांवर नाबाद राहिला. दिल्लीला २० षटकांत कशाबशा ५ बाद १३५ धावाच करता आल्या. सुनील नरीननं ४ षटकांत २७ धावा दिल्या, तर ल्युकी फर्ग्युसननं २६ धावांत १ विकेट घेतली. शाकिबनं ४ षटकांत २८ धावा दिल्या. वरुण चक्रवर्थीनं ४ षटकांत २६ धावांत २ विकेट्स घेतल्या.
वेंकटेश अय्यर व शुबमन गिल यांनी कोलकाताला सावध सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. कागिसो रबाडानं स्वतःच्याच गोलंदाजीवर अय्यरचा रिटर्न झेल सोडला. दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतचे सर्व डावपेच अपयशी ठरले. पहिल्या १० षटकांत त्यानं यशस्वी गोलंदाज अॅनरिच नॉर्ट्जे याच्याकडून केवळ एकच षटक फेकून घेतलं. गिल एका बाजूनं विकेट टिकवून खेळत होता, तर अय्यर उत्तुंग फटके टोलवत होता. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघासाठी टीम इंडियात नेट बॉलर म्हणून निवड झाल्याचा जणू तो आनंदच साजरा करत होता. त्यानं ३८ चेंडूंत यंदाच्या पर्वातील तिसरे अर्धशतक पूर्ण केले.
ज्या कागिसो रबाडानं अय्यरला जीवदान दिले त्यानंच ही विकेट मिळवली. अय्यर ४१ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५५ धावंवर झेलबाद झाला. त्यानं पहिल्या विकेटसाठी गिलसह ९६ धावांची भागीदारी केली. १५व्या षटकात आर अश्विननं कोलकाताचा फलंदाज नितीश राणा याचा सोपा झेल सोडून दिल्लीच्या पायावर आणखी एक धोंडा मारला. अय्यर माघारी गेल्यानंतर गिलनं सूत्र हाती घेतली. पण, त्याला अर्धशतकानं हुकलावणी दिली. १७व्या षटकात आवेश खानच्या गोलंदाजीवर गिल ४६ धावांवर झेलबाद झाला. अय्यर व गिल यांनी कोलकाताला सामना अलगद आणून दिला होता, आता अन्य फलंदाजांना विजयाची औपचारिकता पूर्ण करायची होती. १८ चेंडूंत ११ धावांची गरज असताना कागिसो रबाडानं १८व्या षटकात केवळ १ धाव देत दिनेश कार्तिकचा ( ०) त्रिफळा उडवला. नॉर्ट्जेनं १९व्या षटकात फक्त ३ धावा देत, इयॉन मॉर्गनचा त्रिफळा उडवला.
रिषभनं अखेरचं षटक अनुभवी आर अश्विनच्या हाती सोपवला अन् त्यानं पहिल्या तीन चेंडूंत १ धाव देत शाकिब अल हसनची विकेटही मिळवली. पुढच्याच चेंडूवर अश्विननं सुनील नरीनची विकेट घेतली. आता कोलकाताचे पाठीराखे शांत झाले होते आणि १७ षटकं शांत बसलेले दिल्लीचे चाहते नाचू लागले होते. पण, राहुल त्रिपाठीनं खणखणीत षटकार मारून कोलकाताचा विजय पक्का केला. कोलकातानं हा सामना ३ विकेट्स राखून जिंकला.
पराभव जिव्हारी; रिषभ पंत, पृथ्वी शॉ यांना भावना अनावर
दिल्लीनं ५ बाद १३५ धावा करूनही कोलकाताला विजयासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. बिनबाद ९६ वरून कोलकाताचा डाव ७ बाद १३० असा गडगडला. परंतु राहुल त्रिपाठीच्या एका खणखणीत फटक्यानं दिल्लीच्या स्वप्नांचा चुराडा केला. या पराभवानंतर दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत, पृथ्वी शॉ यांना भावना आवरता आल्या नाही.
सामन्यानंतर तो म्हणाला, एकदा मॅच संपल्यानंतर काहीच बदलू शकत नाही. आम्ही नेहमी स्वतःवर विश्वास ठेऊन खेळ केला आणि सामन्यात जेवढं शक्य होईल, तेवढे प्रयत्न केले. गोलंदाजांनी सामना फिरवलाच होता. कोलकाताच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आणि त्यांच्या टिच्चून माऱ्यासमोर आम्ही स्ट्राईकही रोटेट करू शकलो नाही. पुढील पर्वाय आणखी दमदार कामगिरी करू, अशी आशा व्यक्त करतो. या संपूर्ण पर्वात आम्ही चांगली कामगिरी केली. आम्ही एकजुटीनं राहिलो आणि एकमेकांची काळजी घेतली.’