
शारजाह : ना मुंबई इंडियन्सला, ना पंजाब किंग्सला कोणालाच संधी द्यायची नाही, असा निर्धार करूनच कोलकाता नाइट रायडर्स मैदानावर उतरले. शारजाहच्या मैदानावर कोलकातानं यंदाच्या पर्वातील सर्वोत्तम धावसंख्येचा विक्रम करताना राजस्थान रॉयल्सवर आधीच दडपण निर्माण केलं. शुभमन गिल व वेंकटेश अय्यर यांनी तुफान फटकेबाजी केली. त्यानंतर गोलंदाजांनी त्यांची कामगिरी चोख बजावली. शिवम मावीचे विशेष कौतुक करायला हवं. त्यानं चार विकेट्स घेतल्या. सनरायझर्स हैदराबादनंतर पंजाब किंग्स व राजस्थान रॉयल्स ऑफिशियली प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकले गेले आहेत. कोलकाताच्या राजस्थान रॉयल्सला ८६ धावांनी मात देत मोठा विजय स्वत:च्या नावे केला आहे.
वेंकटेश अय्यर व शुभमन गिल यांनी वादळी सुरुवात केली. राहुल टेवाटियानं ११व्या षटकात ही जोडी तोडली. राहुलच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्विप मारण्याचा वेंकटेशचा प्रयत्न फसला अन् तो (३८) त्रिफळाचीत झाला. त्यानंतर आलेल्या नितिश राणानं त्याच्या पहिल्याच षटकात ग्लेन फिलिप्सला धुतले, परंतु त्याच षटकात त्याची विकेटही पडली.
दोन विकेट लागोपाठ पडल्यानंतर कोलकाताचा खेळ मंदावेल असे वाटत होते, पण गिल चांगलाच दाणपट्टा चालवत होता. त्यात कर्णधार संजू सॅमसनकडून राहुल त्रिपाठीचा झेल सुटला. गिलनं ४० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. गिल ४४ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारासह ५६ धावांवर माघारी परतला. राहुल त्रिपाठी १४ चेंडूंत २१ धावा करून चेतन सकारियाच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. इयॉन मॉर्गन १३ व दिनेश कार्तिक ११ धावांवर नाबाद राहिले आणि कोलकातानं ४ बाद १७१ धावा केल्या.
मॉर्गननं पहिलं षटक शाकिब अल हसनकडून टाकून घेतले. पहिल्याच चेंडूवर यशस्वी जैस्वालचा झेल यष्टीरक्षक दिनेश कार्तिकनं झेल सोडला, पण त्याचा फार फायदा यशस्वीला उठवता आला नाही. तिसऱ्याच चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला. कर्णधार संजू सॅमसनही (१) दुसऱ्या षटकात शिवम मावीच्या गोलंदाजीवर बाद झाला. लाएम लिव्हिंगस्टोन (६) व अनुज रावत (०) हेही फार कमाल करू शकले नाही. राजस्थानची अवस्था ४ बाद १३ अशी झाली होती. ग्लेन फिलिप्सनं फटकेबाजी करून राजस्थानच्या आशा पल्लवीत केल्या, परंतु शिवम मावीनं त्याचाही त्रिफळा उडवला. त्याच षटकात सेट झालेल्या शिवम दुबेचाही (१८) त्यानं पत्ता गायब केला.
६ बाद ३४ धावांवरून आता राजस्थानला कमबॅक करणे अवघडच होते. ख्रिस मॉरिसला वरूण चक्रवर्थीन पायचीत केलं. २००९च्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा संघ ५८ धावांवर गडगडला होता. त्यांनी हा पल्ला ओलांडला पण, लाजीरवाणा पराभव पदरी पडलाच. राहुल टेवाटियानं (४४) एकट्यानं संघर्ष केला, पण तो अपुरा ठरला. राजस्थानचा संघ ८४ धावांवर तंबूत परतला आणि कोलकातानं ८६ धावांनी विजय मिळवला. कोलकाताच्या या विजयानं पंजाब किंग्सला प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकलेच, शिवाय गतविजेत्या मुंबई इंडियन्सचीही कोंडी केली.