मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटींचा मनी लॉन्ड्रिंग घोटाळ्याचा आरोप केला आहे. सोमय्यांनी हसन मुश्रीफ, मुश्रीफ यांची पत्नी आणि त्यांचे पुत्र नावेद यांच्याविरुद्ध आयकर अधिकाऱ्याकडे तक्रार करून मुश्रीफ कुटुंबीयांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र मंत्री हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्यांचे आरोप फेटाळून लावत त्यांच्या १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा दिला आहे.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं की, किरीट सोमय्या यांनी संपूर्ण माहिती घेऊन भाष्य करावं. त्यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. सोमय्यांच्या आरोपाने भाजपाची प्रतिमा मलिन होतेय. किरीट सोमय्यांनी हवी तिथं खुशाल चौकशी करावी. महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठीच भाजपाकडून वारंवार आरोप लावले जात आहेत. सोमय्यांना कारखान्याचं नाव सुद्धा वाचता येत नाही. आयकर विभागाने दोन वर्षापूर्वीच चौकशी केली आहे. माझ्याकडे बेनामी संपत्ती असल्याचा शोध सोमय्या यांनी कुठून लावला? चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांनी काही तरी माहिती दिल्यानंतर सोमय्या यांनी हे आरोप केले आहेत, असा दावा त्यांनी केला. त्यांनी कोल्हापूरात येऊन माहिती घ्यावी असा टोला मुश्रीफांनी लगावला.
किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपामुळे कोल्हापुरात भाजपच भुईसपाट होणार हे निश्चित आहे. सोमय्यांनी कोल्हापूरात येऊन ८ दिवस राहावं. त्यानंतर त्यांचे मन परिवर्तन होईल. रस्ते घोटाळ्याचा आरोप असणारे चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार आहे. अमित शाह यांच्यामुळेच चंद्रकांत पाटलांना मंत्रिपद मिळालं. बांधकाम खातं, महसूल खातं, सहकार खातं अमित शाह यांच्यामुळेच चंद्रकांत पाटलांना मिळालं. किरीट सोमय्यांना काहीही माहिती नाही, कुठलेही पुरावे नसताना आरोप केल्यामुळे येत्या २ आठवड्यात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा कोर्टात दाखल करणार असल्याचा इशारा मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.
दरेकर यांनी शांत राहावं, संयम पाळावा
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कुठलेही आरोप करताना टीका करताना जरा शांत राहावं, संयम पाळावा असा टोला मंत्री हसन मुश्रीफ यांनी दरेकरांना लगावला.
चंद्रकांत पाटील यंच्यावरही हायब्रीड अन्यूईटी रस्ते घोटाळ्याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार करणार आहे. राज्यातील ९० टक्के रस्ते बंद आहेत. कंत्राटदार पळून गेले आहेत. कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. कायदेशीर सल्ला घेऊन अँटी करप्शनमध्ये त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणार आहे, असं सांगतानाच समरजीत घाटगे यांचा पैराही वेळच्या वेळी फेडू, असं सूचक विधान त्यांनी केलं आहे.
लोकांनी पैसा दिला अन् कारखाना उभा राहिला
जवळ जवळ हजारो शेतकऱ्यांनी कारखान्यात पैसा गुंतवला होता. क्रांती दिनाच्या दिवशी आम्ही शेअर्स काढले. आपला कारखाना पाहिजे म्हणून आम्ही कारखाना काढला होता. त्यावेळी सरकारने सहकारी कारखानदारी बंद केली होती, रजिस्ट्रेशन बंद केलं होतं. भाग भांडवल बंद केलं होतं. म्हणून आम्ही हा प्रायव्हेट कारखाना काढला. ज्या दिवशी लायसन्स मिळवलं आणि आवाहन केलं तेव्हा १७ कोटी रुपये एका दिवशी जमा झाले. एचडीएफसी, अॅक्सिस बँक आणि महाराष्ट्र देना बँक यांची नोट काऊंट करणारी मशीन घेऊन लोक चार दिवस पैसे मोजत होते. हजारो लोकांनी पैसा दिला. त्याचा कोल्हापूरच्या इन्कम टॅक्सने तपास केला. लोकांना नोटिसही पाठवली होती. त्यांचीही चौकशी केली होती. त्यातून हा कारखाना उभा राहिला. या कारखान्याची कर्जफेडही झाली. हा नववा हंगाम आहे. सोमय्याला त्याची काहीच माहीत नाही. कुणी तरी त्यांना सांगितलं म्हणून ते बोलत आहेत, असं ते म्हणाले.
सातवा दावा करणार
सोमय्या हे माझी प्रतिमा डागळण्यासाठीच बोलत आहेत. माझ्यावर जेव्हा जेव्हा असे आरोप केले तेव्हा तेव्हा आरोप करणाऱ्यांवर मी ५० कोटींचे दावे केले आहेत. आता सातवा दावा करणार आहे. १०० कोटींचा दावा करणार आहे. मी १७ वर्षे मंत्री आहे. माझ्यावर कधीच कोणता आरोप झाला नाही. उलट तुमच्या काळात अनेक घोटाळे झाले, असं ते म्हणाले.
मी अनेक दिवसांपासून मी सांगत होतो की, माझा पक्ष आणि पवार साहेबांवर आरोप झाले, त्याला मी प्रत्युत्तर दिले. त्यामुळे आपल्यावर आरोप होणार ही खात्री होती. या आरोपांचा मी निषेध करतो, असं मुश्रीफ म्हणाले. सोमय्या यांच्या सीए पदवीवर शंका आहे. यापूर्वी ईडीची धाड पडली. मात्र त्यांना काहीच मिळालं नाही.
दाव्याच्या स्टॅम्प ड्युटीसाठी लागणारा व्हाईट मनी आहे का? चंद्रकांत पाटलांचा मुश्रीफांना खोचक सवाल
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफांना खोचक सवाल केलाय. दावा दाखल करताना स्टॅम्प ड्यूटीसाठी लागणारा व्हाईट मनी आहे का? असा प्रश्न पाटील यांनी केला आहे.
हॅब्रीड अॅन्यूईटी मध्ये ३० हजार कोटीची कामं निघाली. सरकारकडे पैसे नसल्यामुळे दोन वर्ष ६० टक्के आणि ४० टक्के अशी ती कामं होती, त्याचं टेंडर निघालं, काम पूर्ण होत आहेत. हॅब्रीड अॅन्यूईटीमध्ये जी कामं झाली ती नॅशनल लेव्हलची झालेत. ती मग थांबवायला हवी होती, का थांबवली नाहीत? मुश्रीफांच्या आरोपांमध्ये बूड असेल तर माझ्यावर कारवाई होईल, मी काय घाबरत नाही. मी जसं म्हटलं, मी घाबरत नाही, त्यांनीही म्हणावं. कितीही कोटीचा दावा केला तरी दावा करण्यासाठी २५ टक्क्याची स्टॅम्प ड्युटी लागते, तेवढा व्हाईट मनी आहे का? असा खोचक सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.