मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनतर राज्यात खळबळ उडालेली आहे. मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची सविस्तर माहिती घेण्यासाठी सोमय्या २० सप्टेंबर रोजी कोल्हापुरात जाणार आहेत. तर दुसरीकडे सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस आली असून त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास मनाई करण्यात आली आहे. या नोटिशीनंतर माझ्या दौऱ्यामध्ये ठाकरे सरकारकडून खोडा घातला जातोय, असा आरोप खुद्द सोमय्या यांनी केला आहे. मला गणेश विसर्जनासाठी जाऊ दिले जात नाहीये. माझ्या घरात डझनभर पोलीस पाठवण्यात आले आहेत, असं सोमय्या यांनी म्हटलंय.
किती दिवस डांबून ठेवणार, घोटाळे बाहेर काढणारच : सोमय्या
हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची आणखी माहिती घेण्यासाठी मी कोल्हापूरला जाणार आहे. परंतु माझ्या दौऱ्यावर ठाकरे सरकारने प्रतिबंध घातला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मला अटक करण्यासाठी माझ्या घरात डझनभर पोलीस पाठवले आहेत. मला गणेश विसर्जनासाठीही जाऊ दिले जात नाही, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे. तसेच मी उद्धव ठाकरे यांना चॅलेन्ज देतो. तुम्ही मला किती दिवस पोलीस ठाण्यात डांबून ठेवणार ? मी तुमचे घोटाळे बाहेर काढल्या शिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही सोमय्या यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
राज्य सरकारने माझ्या घरात पोलीस पाठवले आहेत. माला कोल्हापूरला जाऊ दिले जात नाहीये, असा दावा केलाय. तसेच मला कोणीही कितीही अडवले तरी कोल्हापूरला जाणारच असं ठामपणे सांगितलं आहे. हसन मुश्रीफ हादरले आहेत. मुश्रीफ यांनी भ्रष्टाचाराचे ९८ कोटी रुपये आपल्या संस्थेत तसेच कारखान्यात गुंतवले आहेत. मी उद्याच कोल्हापुरात जाऊन कारखान्याची पाहणी करणार होतो. पण त्यांनी कोल्हापूरला १४४ लावले. त्यानंतर ठाकरे यांनी माझा दौरा प्रतिबंधित केला आहे. तसेच वळसे पाटील यांनीही माझ्या घरात पोलीस पाठवले आहेत. पण हे घोटाळेबाज सरकार आहे. काही झाले तरी मी कोल्हापूरला जाणारच, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.
सोमय्या यांना स्थानबद्ध केलं, राज्य सरकारचा निषेध : फडणवीस
We strongly condemn the illegal detention of Former MP @KiritSomaiya ji & we will continue to our fight against MVA.
माजी खा. किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आहे, त्याचा आम्ही निषेध करतो.
राज्य सरकारविरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहील.#KiritSomaiya— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 19, 2021
दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या घरासमोर पोलिसांचा ताफा वाढल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत राज्य सरकारचा निषेध केला आहे. त्यांनी सोमय्या यांना स्थानबद्ध करणं चुकीचं असल्याचं म्हटंलय. तसेच काहीही झालं तरी आमचा राज्य सरकारविरोधातील संर्घष सुरुच राहणार आहे, असं ठणकावून सांगितलंय.
सोमय्या आतंकवादी, दरोडेखोर का बलात्कारी? चंद्रकांत पाटील भडकले
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे आतंकवादी, दरोडेखोर का बलात्कारी आहेत? त्यांनी कशामुळे कोल्हापुरात यायचं नाही? आता महाराष्ट्रात अधिकृतपणे आणीबाणी घोषित करा. सोशल मीडियावर लिहायचं नाही. ताबोडतोब नोटीस, अटक, अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचं स्वातंत्र्य नाही, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रोष व्यक्त केला.
किरीट सोमय्यांना तुम्ही का अटक करणार आहात? त्याचं कारण द्या. अजूनही किरीट सोमय्या यांना लेखी नोटीस देण्यात आलेली नाही. किरीट सोमय्या वारंवार सकाळपासून नोटीस द्या, अशी मागणी करत आहेत. कधी आयजी समजवण्याचा प्रयत्न करतात. किती यंत्रणा दबावाखाली काम करतेय. गेल्या तीन दिवासांपासून मी लांबून पाहतोय. किरीट सोमय्या यांना मुंबईतल्या गणपती विसर्जनाला जाऊ दिलं जात नाहीय. त्यापेक्षा आणीबाणीच घोषित करा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
माझं आणि सोमय्या यांचं सातत्याने बोलणं सुरु आहे. सोमय्या हे इतके आक्रमक नेते आहेत की ते असल्या दडपशाहीला घाबरनार नाहीत. जेव्हा झेड सुरक्षा नव्हती तेव्हाही ते फिरत होते. ज्यांना झेड सुरक्षा आहे त्यांना फिरायला बंदी करताय? किरीट सोमय्या उद्या हायकोर्टात जातील. ज्यांना झेड सुरक्षा आहे त्यांना तुम्ही फिरायला बंदी करताय तर तुम्ही सर्वसामान्यांचं वाटोळंच करणार, असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केला.