एनसीबीचा पंच किरण गोसावीची असिस्टंट शेरबानो कुरेशीला अटक
मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानच्या अटकेनंतर चर्चेत आलेला किरण गोसावी याची असिस्टंट शेरबानो कुरेशी हिला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. २०१८ मध्ये पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात किरण गोसावी आणि त्याची असिस्टंट शेरबानो कुरेशीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. किरण गोसावी अद्याप फरार असून शोध सुरु आहे.
एनसीबीच्या क्रूझ ड्रग्स प्रकरणात किरण गोसावी एनसीबीचा पंच म्हणून समोर आला होता. त्याने अनेक तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलिसांनी त्याची असिस्टंट असणाऱ्या शेरबानो कुरेशी हिला अटक केली आहे. गोवंडी परिसरातून अटक केली. बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळल्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. चिन्मय देशमुख या तरुणाला मलेशिया येथे नोकरीसाठी पाठवतो असे सांगून फसवणूक करण्यात आली होती. या नंतर दोघे फरार झाले होते. पालघरच्या केळवे सागरी पोलीस ठाण्यात देखील दोन तरुणांनी किरण गोसावी याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती
एनसीबीने नुकत्याच केलेल्या क्रूझवरील कारवाईनंतर किरण गोसावीचा आर्यन खान हा एनसीबीच्या ताब्यात असताना एक सेल्फी व्हायरल झाला होता. तसंच किरण गोसावी हा क्रूझवरील आरोपींना एनसीबी कार्यलायात घेऊन जात असताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर किरण गोसावी चर्चेत आला होता. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी किरण गोसावी आणि भाजपच्या एका पदाधिकाऱ्याचे पितळ उघडे करून हे दोघे एनसीबीच्या कारवाईत काय करीत आहेत असा सवाल केला होता. दरम्यान एनसीबीने पत्रकार परिषद घेऊन किरण गोसावी आणि भाजप पदाधिकारी हे क्रूझ छापेमारी प्रकरणात स्वतंत्र साक्षीदार असल्याचे स्पष्ट केले होते.