मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी, पवार साहेबांना बारमालकांची काळजी; सामान्य माणसा तूच तुझा वाली!
केशव उपाध्ये यांची ठाकरे सरकारवर टीका

मुंबई : महाराष्ट्रातील लॉकडाऊनची मुदत १ जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्याबद्दलचं परिपत्रक शासनाकडून जारी करण्यात आलं आहे. आता ब्रेक द चैनचे निर्बंध १ जून सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असतील, असं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलंय. ठाकरे सरकारच्या या निर्णयावर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी खोचक टीका केलीय. ‘मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली, पवार साहेबांना बारमालकांची काळजी; सामान्य माणसा तुच तुझा वाली’, अशा शब्दात उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावलाय.
“लॉकडाऊन पुन्हा वाढला. मुख्यमंत्री म्हणालेच होते, “माझे कुटुंब, माझी जबाबदारी!”… सामान्यमाणसा,नोकरदारा, बलुतेदारा, नोकरदारा, कष्टकरी मजुरा, तूचआहेस तुझा रक्षणकर्ता. मायबाप राज्य सरकारने तुला नव्या लाटेत वाऱ्यावर सोडले आहे. तुझा ईएमआय, तुझ घरखर्च, तुझ लाईटबिल तुच पहा. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे, पवार साहेबांना बारमालकांची काळजी, तू तुझ्या कुटुंबाची जबाबदारी घे. वसुली सरकारवर विसंबून राहण्यात अर्थ नाहीत वसुली सरकारमध्ये पोलिसात वाजे तर लस द्यायला फरहान अख्तर लाडका आहे, सामान्य माणसा तुच तुझा वाली”, असं ट्विट करत उपाध्ये यांनी ठाकरे सरकारच्या लॉकडाऊन वाढवण्याच्या निर्णयावर टीका केलीय.