Top Newsआरोग्य

चिंताजनक ! केरळमध्ये निपाह विषाणूची एन्ट्री, १२ वर्षीय मुलाचा मृत्यू; केंद्राचीही टीम रवाना

तिरुवनंतपूरम : केरळमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानं चिंता वाढवलेली असताना आता निपाह व्हायरसची त्यात भर पडली आहे. केरळच्या कोझिकोडमध्ये एका १२ वर्षीय मुलाचा निपाह विषाणूची लागण झाल्यानं मृत्यू झाला आहे. निपाह व्हायरसची लागण झाल्याची लक्षणं दिसून आल्यानंतर स्थानिक रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं होतं. आरोग्य विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारनं निपाह विषाणूचा संशयित रुग्ण आढळल्याची माहिती मिळताच शनिवारी रात्री उशिरा आरोग्य अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक बोलावली होती.

केंद्र सरकारकडून देखील याची पुष्टी झाली असून केंद्राचंही आरोग्य पथक केरळला रवाना झाल्याची माहिती देण्यात आली आहे. निपाह विषाणूच्या पार्श्वभूमीवर आवश्यक अशी सर्व मदत राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला करण्यात येईल असं केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे.

आम्ही सध्या काही टीम्स तयार केल्या असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि इतर आवश्यक उपाययोजना आधीच सुरु करण्यात आलेल्या आहेत. चिंता करण्याचं कोणतंही कारण नाही. सरकार पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे, असं केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितलं.

दरम्यान, ज्या १२ वर्षीय मुलाला निपाह व्हायरसची लागण झाली. त्याच्या संपर्कात असलेले कुटुंबीय आणि इतर व्यक्तींमध्ये निपाहची कोणतीही लक्षणं आढळून आलेली नाहीत. घटनेची माहिती मिळताच तातडीनं कोझिकोडकडे रवाना होत असल्याचंही जॉर्ज यांनी सांगितलं आहे.

केरळच्या कोझिकोडमध्येच १९ मे २०१८ रोजी निपाह विषाणूचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर १ जून २०१८ पर्यंत राज्यात निपाहच्या संक्रमणामुळे १७ जणांचा मृत्यू झाला होता आणि १८ जणांना लागण झाल्याची माहिती समोर आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button