Top Newsसाहित्य-कला

नारळीकरांच्या अनुपस्थितीवर कौतिकराव ठाले पाटील नाराज

नाशिक : तीन वर्षांपूर्वी साहित्य संमेलन अध्यक्ष निवडीसाठी घटना बदलली. मात्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत डॉ. जयंत नारळीकर आले असते तर बरं झालं असतं, असं मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव पाटील व्यक्त केले. नाशिक येथे होत असलेल्या ९४ वे अखिल भारतीय मराठी संमेलनात ते बोलत होते.

कौतिकराव ठाले पाटील म्हणाले की, उस्मानाबाद साहित्य संमेलनात मणक्याचं दुखणं असतांना फादर फ्रान्सिस दिब्रेटो आले होते. आपल्यासाठी अनेक लोक येणार हे जाणून फादर दिब्रेटो आले होते. मला नारळीकर यांना दोष द्यायचा नाही. मात्र, त्यांची सर्व तयारी करण्याचं ठरवूनही ते आले नाही. यामुळे यंदाच्या साहित्य संमेलनाला वेगळी किनार लागली. आता पुन्हा घटना बदलावी ही आमची इच्छा असल्याचेही कौतिकराव ठाले पाटील म्हणाले.

आजचा समाज काही बाबतीत सोयीनं वागतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सेलिब्रिटी मौन पाळतात. राजकारणी शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्दयपणे वागतात. म्हणून या प्रश्नावर परिसंवाद घेतला आहे. आजकालचे ग्रंथ उदबोधक असतात असे नाही. जात पात आमच्या मनात येत नाही. आमची एकच भाषा म्हणजे साहित्य आहे. नाशिक साहित्य संमेलनात हा प्रश्न उपस्थित झाला, याचा मला खेद वाटतो. जात पात विषयावर साहित्य संमेलन जितक वेठीस धरल गेलं, तितकं कुठलंच संमेलन वेठीला धरलं गेलं नाही. याचा मला खेद वाटतो, असंही कौतिकराव ठाले पाटील म्हणाले.

ते म्हणाले की, तरुण साहित्यिकांना बोलत करणं हा साहित्य संमेलनाचा प्रयत्न आहे.समाज स्थितीशील राहिला नाही गतिशील झाला आहे. हळुवार का होईना बदल होत आहे हा बदल समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले. साहित्य संमेलनाच्या साहित्यिक मेजवाणीचा लाभ नागरिकांना घ्यावा विविध कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन कौतिकराव ठाले पाटील यांनी केले.

सत्कार मागून मिळत नसतो, ठाले-पाटलांचे लिंबाळेंना प्रत्युत्तर

‘सत्कार मागून मिळत नसतो. तो सन्मानाने मिळत असतो. आम्ही कुणीही जात पात मानत नाही,’ असे म्हणत साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी शुक्रवारी साहित्य संमलेनाच्या उद्घाटन कार्यक्रमातच ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘ज्यांना पुरस्कार मिळतात, त्यांची पुस्तके चांगली असतातच असे नाही,’ असा टोलाही त्यांनी यावेळी हाणला. यापूर्वी शरणकुमार लिंबाळे यांनी सत्कारावरून साहित्य महामंडळावर जोरदार टीका केली होती. त्याचा समाचार आज कौतिकरावांनी आपल्या भाषणातून घेतला आणि सारेच क्षणभर अवाक झाले.

टीकेची पार्श्वभूमी

ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांच्या ‘सनातन’ या कादंबरीला २०२० या वर्षीचा मानाचा सरस्वती सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. १५ लाख रुपये, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मात्र, तरीही नाशिक येथे होत असलेल्या साहित्य संमेलनाचे साधे निमंत्रणही त्यांना मिळालेले नव्हते. यावर लिंबाळे यांनी ‘मी नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात २५ वर्षे होतो. याआधी नाशिकला संमेलन झाले, त्याही वेळी मला निमंत्रण नव्हते. यंदाही निमंत्रण नाही. संमेलन विशिष्ट गट, कंपूपुरते मर्यादित राहिले आहे. संमेलन सर्वसमावेशक झाले पाहिजे.’ अशी टीका केली होती. सोबतच ‘ज्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळालेली आहे, भाषा आणि साहित्यासाठी ज्यांनी योगदान दिले आहे, त्यांनाही संमेलनात स्थान मिळाले पाहिजे. लोकांच्या पैशातून केवळ जवळच्या व्यक्तींचा सन्मान करून, त्यांना उपकृत करणे योग्य नाही. सरस्वती सन्मान नाकारणाऱ्यांचा उदो उदो होतो आणि पुरस्कार स्वीकारणाऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते,’ असा आरोपही केला होता. विशेष म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यानंतर, महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्या पत्नी अनुराधा पाटील यांचा संमेलनात सत्कार करण्यात आला होता. लिंबाळे यांच्या या आरोपाला या साऱ्या प्रकरणाचा संदर्भ होता.

ठाले पाटलांची खोचक टीका

साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांनी केलेल्या या आरोपाचा कौतिकराव ठाले-पाटील यांनी आपल्या भाषणातून समाचार घेतला. ते म्हणाले, ‘आम्ही जात-पात मानत नाही. आमच्या आणि स्वागतमंडळाच्या मनात तसं काहीही नाही. अशी वादळे निर्माण करणे, अडथळे निर्माण करणे योग्य नाही. सत्कार मागून मिळत नसतो. सन्मानाने मिळत असतो. ज्यांना पुरस्कार मिळतात त्यांची पुस्तके वाचण्यासाठी असतातच असे नाही, अशी जोरदार टीका यावेळी कौतिकरावांनी केली. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी शरणकुमार लिंबाळे यांचे नावही घेतले. ‘ज्यांना यापूर्वी पुरस्कार मिळाले, त्यांच्यावर वर्तमान पत्रांनी पानपान मजकूर लिहिला. महेश एलकुंचवार, भालचंद्र नेमाडे यांच्यावर अनेकांनी पुरवण्या काढल्या. तुम्हाला पुरस्कार मिळाल्यानंतर कोणत्या वर्तमानपत्राने पुरवणी का काढली नाही,’ अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली. आता यावर लिंबाळे काय उत्तर देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

कौतिकराव म्हणाले की, ’९३ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची साहित्य संमेलनापूर्वी प्रकृती बिघडली. ते व्हीलचेअरवर बसून संमेलनाला आहे. तशा स्थितीत पन्नासेक मिनिटे आमच्या सोबत घालवली. आता आता ९४ व्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचीही तब्येत ठिक नाही. त्यामुळे त्यांना उपस्थित राहिता आले नाही. खरे तर साहित्य महामंडळाने अध्यक्ष निवडीसाठी घटना दुरुस्ती केली. आता पुन्हा एकदा आम्हाला घटना दुरुस्ती करावे लागते काय किंवा यापुढे आम्हाला चालता-फिरता अध्यक्ष निवडायला हवा,’ अशी टोलेबाजीही त्यांनी यावेळी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button