
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना हायकोर्टाने दणका दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांविरोधात हायकोर्टाच्या निर्देशानुसार सीबीआय आणि ईडी चौकशी करत आहे. या चौकशीविरोधात अनिल देशमुख यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर हायकोर्टाने सुनावणी करण्यास नकार दिला असल्यामुळे हे प्रकरण आता दुसऱ्या खंडपीठासमोर जाणार आहे. अनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयने अटक केली असून त्यांची चौकशी सुरु आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यालाही सीबीआयने अटक केली आहे.
सीबीआय आणि ईडीच्या चौकशीविरोधात अनिल देशमुख यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी घेण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनिल देशमुखांविरोधात १०० कोटी रुपये भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला असून याची चौकशी ईडी आणि सीबीआय करत आहे. हायकोर्टाने अनिल देशमुखांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला असल्यामुळे आता दुसऱ्या खंडपीठापुढे जाण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते -डेरे यांनी दुसऱ्या खंडपीठापुढे दाद मागण्याचे निर्देश दिले आहेत.
अनिल देशमुख यांच्याविरोधातील सीबीआय चौकशीच्या प्राथमिक अहवालात छेडछाड केल्याप्रकरणी देशमुखांचे वकिल आनंद डागा यांना अटक केली आहे. तर सीबीआय अधिकारी अभिषेक तिवारी यांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयने दोघांचीही ७ दिवसीय पोलीस कोठडी मागितील आहे. बुधवारी अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने वरळी सी लिंक येथून ताब्यात घेत २० मिनिटे चौकशी केली होती. गौरव यांची भूमिका स्पष्ट झाली नसल्यामुळे त्यांना सीबीआयनं सोडून दिलं आहे.
तुम्ही दरोडा घालायचा आणि पोलिसांनी तुमचे स्वागत करायचं का? : चंद्रकांत पाटील
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावाई गौरव चतुर्वेदी यांनी सीबीआयनं ताब्यात घेतलं होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारकडून टीका करण्यात येत आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनिल देशमुख यांना सवाल केला आहे. तुम्ही दरोडा घालायचा आणि पोलिसांनी तुमचे स्वागत करायचं का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनिल देशमुख यांच्या जावयावर करण्यात आलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. अनिल देशमुख यांना क्लिन चिट मिळाली की नाही याची चौकशी सुरु आहे. तुम्ही दरोडा घालायचा आणि मग तुम्ही पोलिसांना अटक करायची नाही का?, तुमचे हार घेऊन स्वागत करायचं का? या या उत्तम दरोडा घातला असे म्हणायचं का? सीबीआयनं काय करावं, न करावं हा माझा विषय नाही. अनिल देशमुख यांची संपत्ती धडधड जप्त होते आहे. मग उगाच जप्त होत आहे का? असे प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केले आहेत.




