Top Newsराजकारण

काशी विश्वनाथ धाम म्हणजे परंपरा, आध्यात्मिकता आणि सनातन संस्कृतीचे प्रतिक: मोदी

वाराणसीः उत्तर पर्देशातील वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज काशी विश्वनाथ धामाचं लोकार्पण करण्यात आलं. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वनाथ धामाचं ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व वर्णन केलं. काशी विश्वनाथ धाम हे आपल्या भारतीय परंपरा, आध्यात्मिकता आणि सनातन संस्कृतीचं प्रतिक आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच भारताची प्राचीनता आणि नवीनता या दोन्ही इथे एकत्रितपणे जिवंत होताना दिसतात. इथल्या जुन्या परंपरा भविष्याला दिशा देशात, असं वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केलं.

काशी विश्वनाथ धामाचं वर्णन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आज काशी विश्वनाथ धाम अकल्पित ऊर्जेनं भारलं आहे. आज इथल्या वैभवात आणखी विस्तार होतोय. हा नवा परिसर म्हणजे आपली भारतीय संस्कृती, आध्यात्मिकता आणि भारतीय सनातन संस्कृतीचं प्रतिक आहे. भारतीय परंपरा, ऊर्जा, गतीशीलता इथं दिसून येते. इथे केवळ श्रद्धेचंच दर्शन घडतं असं नाही तर भारताच्या गौरवशाली इतिहासाची अनुभूती इथे मिळते. प्राचीनता आणि नावीन्यते इथे एकत्रितपणे जिवंत होतात. इथल्या पुरातन प्रेरणा भविष्याला दिशा देतात.

यावेळी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काशी विश्वनाथ येथील गंगा आपला प्रवाह बदलत उत्तरवाहिनी होऊन महादेवाच्या दर्शनासाठी येते. ती गंगा आज खूप प्रस्नन असेल. आपण विश्वनाथाच्या चरणी नमन करतो तेव्हा गंगेला स्पर्श करत येणारी हवा आपल्याला आशीर्वाद देते. महादेवाच्या चरणी ध्यान लावताना गंगेवरच्या लहरी आपल्याला दैवी आनंद देतात. गंगेत खूप शक्ती आहे. आजचं हे कार्य म्हणजे गंगेचा आशीर्वाद आहे, असं वक्तव्य मोदी यांनी केलं.

वाराणसीतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प

श्री काशी विश्वनाथ धाम हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्याचं आज लोकार्पण झालं. आज सकाळपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ऐतिहासिक लोकार्पणाला सुरुवात झाली. लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाराणसी शहरात मोठ्या प्रमाणावर साफसफाई करण्यात आली. गंगा घाट, कुंडाची साफ सफाई झाली. गंगेच्या दोन्ही किनाऱ्यांवर ११ लाख दिवे लावण्यात येणार आहेत. तसेच सरकारी कार्यालये, भनं, खासगी इमारतींवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिरांनाही आकर्षकरित्या सजवण्यात येत आहे. या ठिकाणी भजन संध्येचं आयोजन करण्यात आलं आहे. आज नागरिकांनीही आपल्या घरांवर विद्युत रोषणाई करावी, दिवे लावावेत, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

बोली भाषेत स्थानिकांशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाषा याचा अन्यन साधारण संबंध आहे. मोदी ज्या राज्यात तिथल्या बोली भाषेत स्थानिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. भाषा येत नसली तरी तिथल्या भाषेतील एक दोन वाक्य तरी ते हमखास बोलतात. भाषणाच्या सुरुवातीलाच स्थानिक बोलीतून संवाद साधत ते आधी श्रोत्यांच्या मनाची पकड घेतात आणि मग जोरदारा बॅटिंग करत आपलं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचवतात. काशी विश्वनाथ धामचं लोकार्पण करतानाही मोदींनी काशीच्या खास काशिका भाषेत जनतेशी संवाद साधला. मोदींच्या या संवादाला उपस्थितांनीही जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. ही काशीत बोलली जाणारी भाषा आहे. त्यामुळेच या भाषेला काशिका हे नाव पडलं. ही एक आर्य भाषा आहे. तिला काशिका भाषा किंवा काशिका भोजपुरी असंही संबोधलं जातं. भोजपुरी आणि अवधी भाषेच्या मिश्रणातून काशिका भाषा तयार झाली आहे.

काशिका भाषा केवळ वाराणासीशीच मर्यादित असली तरी ही भाषा देशभरात 50 लाख लोक बोलतात. वाराणासीतील लोक देशात ज्या ज्या भागात राहतात तिथे ते बाहेर स्थानिक भाषेत संवाद साधतात. तर घरी आपल्याच काशिका या बोली भाषेतून संवाद साधत असतात. काशिका किंवा काशिका भोजपुरी भाषा ही केवळ बोलचालीतील भाषा आहे. लिखापढीसाठी हिंदी भाषेचा वापर केला जातो. या भाषेची स्वतंत्र अशी लिपी नाही. या भाषेत फारसं साहित्यही नाही. या भाषेचा स्वतंत्र असा शब्दकोश नाही. हिंदू, ऊर्दू आणि भोजपुरीतील शब्दांवर ही भाषा पोसली गेली आहे.

काशी विश्वनाथाच्या साक्षीने तीन संकल्प

काशीमध्ये फक्त एकच सरकार आहे. ज्यांच्या हातात डमरू आहे…असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोलेनाथाच्या चरणी मस्तक टेकविले आणि यावेळी देशाच्या विकासासाठी जनता जनार्दनाला साकडे घालत तीन संकल्पाची मागणी केली.

ज्या कामगारांनी आपला घाम गाळून काशीमध्ये हा भव्य परिसर तयार केला, त्यांचे आभार यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मानले. कोरोनाच्या बिकट काळातही त्यांनी काम थांबवले नाही. मला या श्रमिकांना भेटण्याचे, त्यांचा आशीर्वाद घेण्याचे भाग्य लाभले. काशी तो काशी है! काशी तो अविनाशी है. काशी में एक ही सरकार है, जिनके हाथों में डमरू है, उनकी सरकार है, असे म्हणत पंतप्रधान एकदम तल्लीन झाले.

जिथे गंगा आपली धारा बदलून वाहते. त्या काशीला कोण रोखू शकते, असा सवालही त्यांनी यावेळी केला. पंतप्रधान मोदी म्हणाले, काशी ही चार जैन तीर्थंकरांची भूमी आहे. अहिंसा आणि तपस्याचे प्रतीक आहे. राजा हरिश्चंद्राच्या सचोटीपासून वल्लभाचार्य, रामानंद जी यांच्या ज्ञानापर्यंत तर चैतन्य महाप्रभू, समर्थ गुरु रामदास ते स्वामी विवेकानंद, मदन मोहन मालवीय अशा कित्येकांचा या भूमीशी संबंध आहे. किती ऋषी आणि आचार्यांचा संबंध आहे, असे उद्गार त्यांनी यावेळी काढले.

पंतप्रधान मोदींनी जनतेला भगवान संबोधत त्यांच्याकडून तीन गोष्टी मागितल्या. ते म्हणाले, गुलामीच्या मोठ्या कालखंडाने भारतीयांचा आत्मविश्वास चक्काचूर केला. त्यामुळे आपण आपल्याच सृजनावरील विश्वास गमावून बसलो. आज हजारो वर्ष जुन्या या काशीतून मी देशवासीयांना आवाहन करतो की, त्यांनी पूर्ण आत्मविश्वासाने सृजनाची कास धरावी. नवनिर्मिती करा. इनोवेटीव पद्धतीने काही करा. माझ्यासाठी जनता जनार्दन ईश्वराचे रूप असल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, प्रत्येक भारतीयांमध्ये परमेश्वराचा अंश आहे. त्यामुळे मी तुम्हाला काही मागू इच्छितो. हे माझ्यासाठी नाही, तर आपल्या देशासाठी तीन संकल्प करा. स्वच्छता, सृजन आणि आत्मनिर्भर भारतासाठी सततचे प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मोदी पुढे म्हणाले की, तिसऱ्या संकल्पाची आत्ताच सुरुवात करावी लागेल. हा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आहे. आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली. जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील. तेव्हा मोठा सोहळा होईल. त्यावेळी भारत कसा असेल, त्यासाठी आत्तापासून काम करावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button