कन्नडिगांची अरेरावी; चित्रदुर्गमध्ये शिवसेनेचा ध्वज जाळला
बेळगाव : बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशनला सुरुवात झाली आणि महाराष्ट्र एकीकरण समितीकडून महामेळावा आयोजित करण्यात आला. त्यावेळी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी दीपक दळवी यांच्यावर काळी शाई फेकली, त्यानंतर हा वाद सुरू झाला. आता कर्नाटक विरुद्ध महाराष्ट्र वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्याता आहे.
कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक रक्षण वेदिकेचा लाल-पिवळा ध्वज जाळला होता. त्याचेच पडसाद आज कर्नाटकमधील चित्रदुर्गमध्ये उमटले आहेत. कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा ध्वज जाळला आहे. त्यामुळे सीमाभागातील तणाव पुन्हा वाढला आहे. या घटनेनंतर शिवसैनिक आता आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. अनेकदा शिवसैनिकांनी बेळगावात जाऊन कानडिगांना धडा शिकवला आहे.
बेळगाव कर्नाटकला मिळाल्यापासून हा वाद सुरू आहे. बेळगाव कर्नाटकात गेल्यापासून सीमाभागातील मराठी बांधव १ मे दिवस काळा दिवस म्हणून साजरा करतात. त्यामुळे मराठी विरुद्ध कानडी असा संघर्ष अनेकदा पहायला मिळाला आहे. हा वाद राजकारणातही उतरला आहे. कर्नाटकातील अनेक नेते बेळगाववरून अनेकदा महाराष्ट्रावर टीका करताना दिसून येतात. तर राज्यातल्या नेत्यांकडूनही त्यांना वेळोवेळी प्रत्युत्तर देण्यात आले आहे. बेळगाव महापालिकेवरील झेंड्यावरूनही अनेकदा वाद झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, कधी झेड्यावरून वाद, तर कधी सीमाभागातील प्रश्नांवरून वाद, हा वाद सीमाभागातील मराठी बांधवांना नवा नाही. मात्र त्यांना आजही आशा आहे ती महाराष्ट्रात सामील होण्याची. त्यांची ही इच्छा इतक्या वर्षातही पूर्ण झाली नाही.