नवी दिल्ली : आगामी काही महिन्यांमध्ये ५ राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका आहे. या पार्श्वभूमीवर अन्य पक्षांप्रमाणे काँग्रेसकडूनही रणनीती आखण्यास सुरुवात करण्यात आली आहे. राजकारणातील चाणक्य म्हणून ओळख असलेले प्रशांत किशोर आता काँग्रेससाठी काम करत असून, याचा कितपत फायदा होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच आता सीपीआयमध्ये असलेल्या कन्हैय्या कुमारने काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी तसेच प्रशांत किशोर यांची भेट घेतली असून, यामुळे तो काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
डाव्या पक्षात राहून कन्हैय्या कुमारचा अपेक्षाभंग झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राजकारणातील अनेक जाणकारांच्या मते प्रशांत किशोर यांची भेट घेतली, याचा अर्थ कन्हैय्या कुमार काँग्रेसची वाट धरू शकतो. मीडिया रिपोर्टनुसार, काँग्रेस पक्षातील जुन्या-जाणत्या नेत्यांचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे आता युवकांना प्राधान्य आणि संधी दिली पाहिजे, असा सल्ला प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांना दिल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या दीड वर्षापासून कन्हैय्या कुमार राजकारणात कमी सक्रीय असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, कन्हैय्या कुमारच्या भाषण देण्याच्या शैलीचा काँग्रेसला चांगला फायदा होऊ शकतो, असे प्रशांत किशोर यांचे म्हणणे आहे. तसेच युवकांना संधी देण्याचा सल्ला प्रत्यक्षात आणण्यासाठी कन्हैय्या कुमारला काँग्रेसमध्ये दिला जाऊ शकतो, असे सांगितले जात आहे. या चर्चांवर खुलेपणाने मत व्यक्त करण्यासाठी बिहारमधील कोणताही काँग्रेस नेता तयार नसल्याचे दिसत आहे. उलट, कन्हैय्या कुमारच्या काँग्रेसमधील प्रवेशामुळे त्यांचाच प्रभाव कमी होण्याची चिंता या नेत्यांना लागल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे कन्हैय्या कुमारच्या काँग्रेसमधील प्रवेशावर मतभेद होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.