हैदराबादच्या कर्णधारपदावरून डेविड वॉर्नरची हकालपट्टी! विल्यमसनकडे नेतृत्व
हैदराबाद : सनरायजर्स हैदराबादने डेविड वॉर्नरची कर्णधारपदावरून हकालपट्टी केली आहे. आयपीएलच्या उर्वरित मोसमासाठी त्याच्या जागी न्यूझीलंडचा केन विल्यमसन कर्णधारपदाची धुरा सांभाळेल. वॉर्नरच्या नेतृत्वात हैदराबादला यंदा चांगला खेळ करण्यात अपयश आले. त्यांनी सुरुवातीचे सहा पैकी पाच सामने गमावले असून हा संघ गुणतक्त्यात तळाला आहे. वॉर्नरला फलंदाज म्हणूनही फारसे यश मिळालेले नाही. त्यातच त्याने मनीष पांडेला काही सामन्यांसाठी संघातून वगळण्याच्या निर्णयावरून संघ व्यवस्थापनवर टीकाही केली होती. त्यामुळेच त्याने कर्णधारपद गमावल्याची शक्यता आहे.
केन विल्यमसन उर्वरित मोसमात सनरायजर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व करेल, असे हैदराबादने पत्रकात म्हटले. तसेच त्यांनी वॉर्नरला संघातून वगळण्याचेही संकेत दिले आहेत. रविवारी होणाऱ्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात परदेशी खेळाडूंमध्ये बदल करण्याचा संघ व्यवस्थापनाने निर्णय घेतला आहे, असे सांगण्यात आले. या सामन्यात वॉर्नरला वगळून हैदराबादचा संघ वेस्ट इंडिजचा अष्टपैलू जेसन होल्डरला संधी देण्याची शक्यता आहे.
आम्ही हा निर्णय खूप विचार करून घेतला आहे. मागील काही वर्षांत सनरायजर्स हैदराबादला मिळालेल्या यशात वॉर्नरचे खूप मोठे योगदान आहे. उर्वरित मोसमात वॉर्नर संघासाठी मैदानात आणि मैदानाबाहेरही महत्वाची भूमिका बजावेल याची आम्हाला खात्री असल्याचेही हैदराबादने त्यांच्या पत्रकात म्हटले. वॉर्नरला यंदा कर्णधार आणि फलंदाज म्हणून अपेक्षित कामगिरी करता आली नाही. तो ६ सामन्यांत १९३ धावाच करू शकला आहे.