जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोनावरील लसीचे भारतात होणार उत्पादन
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णसंख्या कोटीच्या घरात पोहोचली आहे. यात मृतांचा आकडाही वाढत आहे. कोरोना रुग्णसंख्य़ा नियंत्रणात आणण्यासाठी देशात लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहे. परंतु लसींचा तुटवड्यामुळे लसीकरण मोहीम थंडावली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतात आता जॉन्सन अँड जॉन्सन लसीचे उत्पादन करण्याबाबत चाचपणी सुरु असल्याची माहिती अमेरिकेचे गृहसचिव डॅनियल बी स्मिथ यांनी दिली आहे.
दरम्यान अलीकडेच अमेरिकन सरकारने कोरोनाविरोधी जॉन्सन अँड जॉन्सन लसीचा वापराला परवानगी दिली आहे. यात भारतातही या लसीच्या उत्पादनासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती स्मिथ यांनी दिली. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी बायडेन प्रशासन भारताच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. त्यामुळे भारतातील लस उत्पादक कंपनी आणि अमेरिकी कंपन्या यांच्यामार्फत देशात लसींचे संयुक्तपणे उत्पादन करणे शक्य आहे की नाही याबाबत चाचपणी सुरु असल्याची माहितीही त्यांनी दिली. भारतात कोरोनाचा तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. यात लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे. त्यामुळे जॉन्सन अँड जॉन्सन लसीच्या उत्पादनास भारतात परवानगी मिळाल्यास आणखी एक लस उपलब्ध होईल जेणे करून कोरोना आटोक्यात आणण्यास मदत होईल अशी माहिती मेरिकेचे गृहसचिव डॅनियल बी स्मिथ यांनी दिली आहे.
अमेरिकेतील डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन भारतात लस उत्पादनात गुंतवणूक करण्यासाठी विचार करत आहे. त्यामुळे कॉर्पोरेशनच्या माध्यमातून जॉन्सन अँड जॉन्सन कोरोना लसीच्या उत्पादनासाठी गुंतवणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे लसीचे उत्पादन वेगाने करता येणे शक्य होऊ शकेल.